धडगाव l प्रतिनिधी
नमामि सातपुडा मिशन या शाश्वत शेती व पर्यावरण संवर्धन कार्यक्रमाची सुरुवात जलसाक्षरता समिती अक्राणीतर्फे करण्यात आली.
या मिशन अंतर्गत बोडक्या डोंगर उतारांवरुन पाण्यासोबत वाहून जाणारी बहुमोल माती अडविणे आणि पर्यायाने जलसंवर्धनाचा कार्यभाग साधून तेथील स्थानिक वृक्ष प्रजातींच्या संगोपनाने सातपुडा हिरवा करणारे हे मिशन आहे. यात सीसीटी, दगडांचे बांध, बांधावर, उतारावर विशिष्ट झाडांची लागवड आणि वनशेती पट्ट्यात पारंपरिक पिकांचे उत्पादन करता येईल अशा प्रकारचे शाश्वत विकासाला पूरक माॅडेल वनस्पतीशास्र विभागाचे विषयतज्ञ प्रा. डाॅ. एच. एम. पाटील तयार केले आहे. या माॅडेलचा प्रथम प्रयोग देवबारा, ता.अक्राणी येथे प्रताप राहसे यांच्या शेतात करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. डाॅ. एच. एम. पाटील , प्रा डाॅ अशोक राठोड, पानसिंग राहसे, पंडित गेंद्रे, जितेंद्र राहसे, माकत्या सिंगा राहसे, जमा सुकल्या राहसे, दिला दिवा राहसे, पंडित गोट्या गेंद्रे,सेवा बासरा राहसे आदी उपस्थित होते.
“नमामि सातपुडा मिशन” माॅडेलचे प्रवर्तक प्रा डाॅ एच एम पाटील हे खान्देशातील पीकांच्या पारंपारिक बियाण्यांचे संशोधक व प्रचारक आहेत. तसेच यशदा पुणे यांच्या जलप्रेमी- २०१८ या जिल्हास्तरीय जलनायक म्हणुन निवड झाली आहे.
तसेच महाराष्ट्र शासना तर्फे नदी प्रहरी म्हणुन नुकतीच निवड झाली आहे. सातपुड्यातील जैवविविधता व शाश्वत विकासावर कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.जलसाक्षरता समिती अक्राणी चे संस्थापक असुन या माध्यमातुनच्या त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय दखल घेतली गेली आहे.








