Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

team by team
August 7, 2023
in राष्ट्रीय
0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

मुंबई  l

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशिला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55,  बिहारमधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिमबंगालमधील 37,  मध्यप्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.

 

 

 

यावेळी संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की नवीन भारत हा विकसित भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या अमृत काळाची सुरुवात आहे. यामागे नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि नवीन संकल्प असल्याचं अधोरेखित करत प्रधानमंत्री म्हणाले की भारतीय रेल्वेच्या इतिहासात ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. देशातील जवळजवळ 1300 महत्त्वपूर्ण स्थानकांचा आता आधुनिकीकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जात असून या अमृत भारत स्थानकांना आता नवसंजीवनी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितलं. एकूण 1300  स्थानकांपैकी अंदाजित 25000 कोटी रुपये खर्चाच्या 508 अमृत भारत स्थानकांची कोनशीला आज बसवण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. देशात रेल्वे तसंच सामान्य नागरिकांच्या बरोबरीनं होत असलेला हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे एक भव्य मोहीम असेल यावर त्यांनी भर दिला. याचे लाभ देशातल्या सर्व राज्यांपर्यंत पोहोचतील हे नमूद करून प्रधानमंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात सुमारे 4000 कोटी रुपये  खर्चाच्या 55 अमृत स्थानकांचा, मध्य प्रदेशात सुमारे 1000 कोटी रुपये खर्चाच्या 34 स्थानकांचा, महाराष्ट्रात 1,500 कोटी रुपये खर्चाच्या 44 स्थानकांचा आणि इतर राज्यांमधल्या स्थानकांसह तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळातल्या महत्त्वाच्या स्थानकांचा विकास या अंतर्गत केला जाणार आहे. यावेळी रेल्वे मंत्रालयाची प्रशंसा करत पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रकल्पाबद्दल नागरिकांचं अभिनंदन केलं आहे.

 

 

 

 

पंतप्रधानांनी जगामध्ये वाढत असलेली भारताची  प्रतिष्ठा अधोरेखित केली आणि भारताविषयी वाढत्या जागतिक आस्थेवर प्रकाश टाकला. यासाठी त्यांनी दोन प्रमुख घटकांना श्रेय दिले. पहिले तर, भारतातील जनतेने स्थिर पूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणले आणि दुसरे म्हणजे, सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आणि लोकांच्या आकांक्षेनुसार विकासासाठी अथक प्रयत्न केले. भारतीय रेल्वे देखील याचेच प्रतीक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधानांनी आपले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी रेल्वे क्षेत्राच्या विस्ताराची वस्तुस्थिती मांडली.

 

 

 

ते म्हणाले की, गेल्या 9 वर्षात देशात टाकलेल्या रेल्वे रुळांची लांबी ही दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, ब्रिटन आणि स्वीडनमधील एकत्रित रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहे. भारतीय रेल्वेच्या विस्ताराचे प्रमाण पाहता प्रधानमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या एका वर्षभरात भारताने दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या या देशांच्या एकत्रित रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त रेल्वेमार्ग निर्माण केले. रेल्वे प्रवास सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे त्यांनी आज आवर्जून सांगितले. रेल्वे प्रवासापासून ते रेल्वे स्थानकापर्यंतचा शक्य तितका सर्वोत्तम अनुभव देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे”, असे ते म्हणाले. रेल्वे स्थानकांवरची उत्तम आसनव्यवस्था, सुधारित वेटिंग रूम आणि हजारो स्थानकांवर मोफत वायफाय यांचा उल्लेख त्यांनी केला.

 

 

भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडी अधोरेखित करताना प्रधानमंत्री म्हणाले की,या यशाबद्दल कोणत्याही पंतप्रधानाला लाल किल्ल्यावरून बोलायला आवडले असते. तथापि, आजच्या कार्यक्रमाच्या भव्य आयोजनामुळेच आपण आजच रेल्वेच्या उपलब्धींवर मोठ्या तपशिलाने बोलत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

रेल्वेचा दर्जा हा आता देशाची जीवनरेखा बनतो आहे असा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला, शहरांची ओळखही आता रेल्वे स्थानकाच्या दर्जावरून होत असून काळाच्या ओघात ही रेल्वे स्थानके शहराचे हृदय बनत चालली आहेत असे नमूद केले. आणि त्यामुळे, या स्थानकांना आधुनिक स्वरूप देणे अत्यावश्यक झाले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

 

 

 

प्रधानमंत्री म्हणाले की, एकाच वेळी इतक्या साऱ्या स्थानकांच्या आधुनिकीकरणामुळे देशात विकासासाठी नवीन वातावरण निर्माण होईल कारण या सर्व कामांमुळे पर्यटकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण व्हायला मदत मिळणार आहे. आधुनिकीकरण झालेल्या या स्थानकांमुळे केवळ पर्यटन क्षेत्रात वाढ होणार नाही तर आसपासच्या भागातील आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे.  ‘एक स्थानक एक उत्पादन’ या योजनेमुळे स्थानिक कारागिरांना मदत होईल आणि जिल्ह्याचे ब्रँडिंग होण्यासही मदत होईल असे त्यांनी नमूद केले.

 

 

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचा संकल्पही देशाने घेतला आहे असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. “ही अमृत रेल्वे स्थानके एखाद्या वारशाचा अभिमान बाळगण्याचे आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान जागवण्याचे प्रतीक ठरतील,” असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. प्रधानमंत्री म्हणाले की, ही अमृत स्थानके भारताच्या सांस्कृतिक आणि स्थानिक वारशाचे दर्शन घडवतील. यासंबंधी उदाहरणे देताना पंतप्रधानांनी नमूद केले की, जयपूर रेल्वे स्थानकांवर राजस्थानमधील हवामहल आणि आमेर किल्ल्याची झलक पाहायला मिळेल, जम्मू-काश्मीरमधील जम्मू तवी रेल्वे स्थानक प्रसिद्ध रघुनाथ मंदिरापासून प्रेरणा घेऊन निर्माण करण्यात येईल, तर नागालँड येथील दिमापूर स्थानक या प्रदेशातील 16 विविध जमातीच्या स्थानिक वास्तुकलेचे दर्शन घडवेल. प्रत्येक रेल्वे स्टेशन हे आपल्या प्राचीन वारश्यासह देशाच्या आधुनिक आकांक्षांचे प्रतीक असेल, असे त्यांनी नमूद केले. देशातल्या ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडणाऱ्या ‘भारत गौरव यात्रा रेल्वे गाड्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

 

देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात रेल्वेची भूमिका अधोरेखित करत, प्रधानमंत्री म्हणाले, की रेल्वेमध्ये सरकारने विक्रमी गुंतवणूक केली आहे. या वर्षी, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी, 2.5 लाख कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे, जी 2014 च्या तुलनेत पांच पट अधिक आहे. आज रेल्वेच्या संपूर्ण विकासासाठी, सर्वंकष दृष्टिकोन ठेवून काम केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. लोकोमोटीव्ह उत्पादनात गेल्या नऊ वर्षात नऊ पट वाढ झाली आहे. आज, 13 पट अधिक प्रमाणात, एचएलबी डबे उत्पादित केले जात आहेत.

 

ईशान्य भारतात, रेल्वेच्या विस्तारीकरणाबद्दल बोलतांना प्रधानमंत्री म्हणाले, आज या भागात  रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण, गेज बदलणे, विद्युतीकरण आणि नवे रेल्वेमार्ग निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. “लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या रेल्वे मार्गाने जोडल्या जातील.” असेही श्री. मोदी यांनी सांगितले. नागालँड राज्याला 100 वर्षांनी, दुसरे रेल्वे स्थानक लाभले, असेही त्यांनी सांगितले. “या भागात रेल्वे मार्गांची उभारणी करण्यात तिप्पट वाढ झाली आहे.” असे ते म्हणाले.

 

गेल्या नऊ वर्षात, 2200 किमी पेक्षा अधिक लांबीच्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्गिका बांधण्यात आल्या असून, त्यामुळे मालगाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे. आता,  दिल्ली एनसीआर भागातून, पश्चिमेकडील बंदरात, केवळ 24 तासात माल पोहोचतो, पूर्वी यांसाठी 72 तास लागत असत. इतर मार्गांमधे 40 टक्के घट झाल्याचे दिसत असून, त्याचा मोठा लाभ, उद्योजक, स्वयंरोजगार आणि शेतकऱ्यांना होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

 

 

रेल्वे पूल नसल्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधत, प्रधानमंत्री म्हणाले, की  2014 पूर्वी देशात, 6000 पेक्षा कमी रेल्वे पूल आणि अंडरब्रीज होते, मात्र आज त्यांची संख्या 10,000 पेक्षा अधिक झाली आहे. दीर्घ मार्गांवरील  मानवरहित रेल्वे क्रॉसिंगची संख्या आता शून्यापर्यंत आली आहे, हे ही त्यांनी नमूद केले. प्रवाशांच्या सोयीसुविधांविषयी बोलतांना, वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यावर, विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

“भारतीय रेल्वे आधुनिक आणि पर्यावरण स्नेही करण्यावर आम्ही भर देत आहोत.” असे प्रधानमंत्री म्हणाले. लवकरच, रेल्वेमार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य पूर्ण होईल, त्यानंतर देशातील सर्व रेल्वेगाड्या वीजेवर चालतील, असं त्यांनी सांगितले. सौर पॅनल पासून निर्माण झालेल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या स्थानकांची संख्या देखील गेल्या नऊ वर्षात 1200 पर्यंत पोहोचली आहे. नजीकच्या काळात, प्रत्येक रेल्वे स्थानकावरुन हरित ऊर्जा उत्पादन करण्याचेही सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आज सुमारे 70,000 डब्यांमधे एलईडी दिवे लावण्यात आले          असून, रेल्वेमधील जैव-शौचालयांची संख्या 2014 पासून, 28 पटींनी वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.सर्व अमृत स्थानके ही हरित इमारतींची मानके पूर्ण करणारी असतील असे पंतप्रधानांनी  अधोरेखित केले. “वर्ष 2030 पर्यंत भारत असा देश बनेल जिथे रेल्वे गाड्या शून्य कार्बन उत्सर्जन करणाऱ्या असतील,”

 

प्रधानमंत्री म्हणाले, “गेली अनेक दशके रेल्वे आपल्याला आपल्या आप्तांशी जोडण्याचे काम करत आहे, रेल्वेने देश जोडण्याचे काम केले आहे. आता रेल्वेला चांगली ओळख आणि आधुनिक वैशिष्ट्ये देणे ही आपली जबाबदारी आहे.” नवीन संसद भवन, कर्तव्य पथ, युद्ध स्मारक आणि स्टेच्यू ऑफ युनिटी अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका केली. “नकारात्मक राजकारणापासून दूर जाऊन, मतपेढीचे राजकारण आणि लांगुलचालन न करता, आम्ही देशाच्या विकासाचे काम एक मिशन म्हणून सुरु केले आणि त्याला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा
Previous Post

गोंडगाव येथील खटला जलदगती न्यायालयात चालवणार

Next Post

जात पडताळणी प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
जात पडताळणी प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार : डॉ. विजयकुमार गावित

जात पडताळणी प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add