नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कामोद बु. येथील नाल्याजवळ शेताच्या सामाईक बांधावरील सागाच्या झाडांच्या हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या भावानेच कोयत्याने वार करुन भावाचा खून केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी ११ जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील कामोद येथील रहिवासी रमेश दादला पावरा व थिक्या दादला पावरा यांच्यात शेताच्या सामाईक बांधावरील सागाच्या झाडाच्या हिस्से वाटणीवरुन वाद झाला. सदर वादातून रमेश दादला पावरा यांना थिक्या दादला पावरा याने लोखंडी कोयत्याने मानेवर, तोंडावर वार करुन खून केला.
तसेच सुनिल थिक्या पावरा, सायलीबाई थिक्या पावरा, गण्या पाडक्या पावरा, दादला पाडक्या पावरा, गिलदार पाडक्या पावरा, खेमा गण्या पावरा, गुलाब गण्या पावरा, रोहिदास दादला पावरा, खेत्र्या उताऱ्या पावरा, रामदास गिलदार पावरा यांनी दगडाने मारहाण करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दिनेश रमेश पावरा, अंकेश दिनेश पावरा यांनाही हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली. याबाबत दिनेश रमेश पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात भादंवि कलम ३०२, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आय.एन.पठाण करीत आहेत








