नंदुरबार l प्रतिनिधी
हतनुर धरणाचे 2 दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येवून 2260 क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात आला आहे. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
आज 9 जुलै 2023 रोजी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास सुलवाडे बेरेज मध्यम प्रकल्पाचे दोन द्वार अर्धा मीटर उंचीने उघडून 3 हजार 847 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तापी नदीवरील पूराच्या पाण्याची शक्यता लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजच्या मध्यम प्रकल्पांतून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील 24 तासात विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी कळविले आहे.








