नंदुरबार मे महिना सुरू झाला की पालकांच्या चिंतेचा विषय असतो तो म्हणजे मुलांसाठी आता करावे काय ? विविध क्लासेस मध्ये त्यांना कोंबून ठेवण्यापेक्षा निसर्गातून ते विनामुल्य अनेक गोष्टी शिकू शकतात. पालकांसोबत, मित्रांसोबत पाल्यांना आपण या गोष्टी सहज दाखवू शकतो.
उदा. रात्री ताऱ्यांचे निरीक्षण करणे, नक्षत्र शोधणे तसेच दिवसा सुर्याच्या बदलत्या स्थानाचे निरीक्षण करणे, सावल्यांचे निरीक्षण करणे. ग्रह एका सरळ रेषेत येणे म्हणजे नेमके काय? पारगमण, अधिक्रमण काय असते याची माहिती आपण देवू शकतो. नेहमीच ग्रह एका सरळ रेषेत का येत नाही, दिवस उन्हाळ्यात मोठा व हिवाळ्यात लहान कसा होत असतो. या सगळ्यांची उत्तरे आपण त्यांना थोडी मदत केली तर सुटू शकतात. आणि मुले सुट्टीचा मनसोक्त आनंद घेवू शकतात.
मे महिन्यात अशीच एक खगोलीय घटना घडत असते. ती म्हणजे स्वत:ची सावली हरवणे. आश्चर्य आहे ना! स्वतःची सावली कधीच साथ सोडत नाही असचं आपण म्हणतो ना! मग मित्रांनो आपली सावली पण आपली साथ सोडू शकते. हो माहिती आहे का? तर हो. त्यालाच आपण शून्य सावली दिवस (zero Shadow day) म्हणतो.
पृथ्वी २३.५° ने कललेली आहे आणि पृथ्वी वरील दोन काल्पनिक वृत्त कर्क वृत्त व मकर वृत्त हे देखील २३.५° उत्तरेला कर्क वृत्त व २३.५° दक्षिणेला मकरवृत्त आहे. त्या पलिकडे सुर्य डोक्यावर येत नाही. तो क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत जातो यालाच सुर्याचे उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. मात्र या दोन टोकांच्या वृत्तांमधील लोकांना दोनदा सुर्य डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सुर्य डोक्यावर असतो तेव्हाच आपली सावली पायाखाली असते. आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा रोमांचकारी अनुभव आहे. सध्या उत्तरायण सुरू असून मे महिना चालू आहे. त्यामुळे ही घटना पाहता येणार आहे. २१ जुन नंतर दक्षिणायन सुरू होते तेव्हा जुलै महिन्यात एकदा पुन्हा आपण शुन्य सावली दिवस अनुभवू शकतो, परंतु तेव्हा आपल्याकडे पावसाळा असल्यामुळे आकाशात ढग असल्याकारणाने आपण हा अनुभव घेऊ शकत नाही.
या वर्षीसुध्दा ३ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरातून ही घटना अनुभवता येत आहेत. महाराष्ट्रात दक्षिणेकडून ‘उत्तरेकडे सुरूवात केली तर सुरूवातीला ३ मे रोजी शून्य सावली सावंतवाडी येथे अनुभवता आली. पुढे ७ मे रोजी पश्चिम महाराष्ट्र, १९ मे मराठवाडा १८ मे विदर्भ आणि २४ मे धुळे व २७ मे नंदुरबार येथे ही घटना आपण अनुभवू शकतो.
आता सगळ्यांनाच प्रश्न पडेल महाराष्ट्रात असे वेगवेगळे दिवस का? तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे अक्षवृत्त व रेखावृत्तीय स्थान काढावे लागते. प्रत्येक रेखावृत्तात चार मिनिटांचा फरक असतो. त्यानुसार सर्वच ठिकाणी एकाच वेळेला १२ वाजत नाही. त्यात प्रत्येक रेखावृत्तानुसार चार मिनिटांचा फरक दिसून येतो. म्हणून जर सिंधुदुर्गला १२ वाजले असतील तर नंदुरबारला १२ वाजून २४ मिनिटे झाली असतील. कारण सिंधुदुर्गचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान १६.३४ अंश उत्तर व ७३.५५ अंश पूर्व आहे. व नंदुरबारचे २१.३६ अंश उत्तर व ७४.२५ अंश पूर्व आहे. तर सिंधुदुर्ग व नंदुरबार मध्ये ६ वृत्तांचा फरक आहे. म्हणून स्थानिक वेळ वेगळी व प्रमाण वेळ वेगळी असते. प्रमाण वेळेनुसार घड्याळी लावलेली असतात.
नंदुरबारला दुपारी १२.१० ते १२.३५ या दरम्यान आपण शून्य सावली अनुभवता येईल. आता हा अनुभव आपण कसा घ्याल यासाठी मार्गदर्शकाची अजिबात गरज नाही. आपण स्वतः जिथे ऊन येत असेल तेथे लंबरूप काठी उभी करा किंवा रोवा नाहीतर पाईप किंवा डब्बा एका ठिकाणी उभा करा. आता १२.१० ते १२.२५ ला रोज त्याच्या सावलीचे निरीक्षण करा. त्यावर खडूने रेषा ओढा आणि बरोबर २७ मे ला सुद्धा खडूने रेषा ओढा. आता आपल्याला सावली जागा बदलते का? निरीक्षण करा. आणि नंतर सुद्धा २७ मे नंतरही निरीक्षण सुरू ठेवा. या निरीक्षणाची नोंद आपल्या वहीत करून ठेवा. त्यावरून अनुमान काढा. बघा आपले सुटीतील ८/१० दिवस कसे मजेत जातात ते. आणि एक खगोलीय घटना स्वतः अनुभवण्याचा आनंद वेगळा. चला तर मग कामाला लागु या! आणि हो कोणी म्हणाले की आपली सावली आपली साथ कधीही सोडू शकत नाही तर त्यांना चोख उत्तर देता येईल. वर्षातून दोनदा आपलीच सावलीही आपली साथ सोडते.
यावर्षीही नक्षत्र छंद मंडळाने विविध उपकरणांच्या माध्यमातून शून्य सावली दिवसाचा अभ्यास करण्याचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना स्वतः ही उपकरणे हाताळता येणार आहेत.
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील इतर गावांमधुन अनुभवता येत आहे. पुढील काही दिवस ही घटना वेगवेगळ्या ठिकाणांहून अनुभवता येणार आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. २१ मे मनमाड, गडचिरोली, २२ मे मालेगांव, ४० गांव, २३ मे खामगांव, अकोला, २४ मे धुळे, वर्धा, शेगांव, २५ मे भुसावळ, जळगांव, अमरावती, २६ मे नागपूर, भंडारा, नवापूर, २७ मे नंदुरबार, शिरपूर, गोंदिया, २८ मे अक्कलकुवा, शहादा, तळोदा, २९मे बोराड, नर्मदा नगर, ३० मे धडगांव, ३१ मे तोरणमाळ व आपआपल्या शहरात, गावात व मैदानात शून्य सावलीचा अनुभव जरूर घ्या.
सौ. चेतना दिनेश पाटील
खगोल अभ्यासक,नक्षत्र छंद मंडळ, नंदुरबार
मो. ९४२०७५५५१३








