नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा म्युनिसिपल हायस्कूल येथे एकूण ३५ शिक्षकांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आज गुरुवार ( दि. २५ मे ) रोजी संपन्न झाला. विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना सेवा निवृत्ती नंतरही समाजात सक्रीय राहणे हेच आयुष्याचं यमक आहे. असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले.
कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना एका ठराविक कालमर्यादेनंतर प्रत्येकाला आरामाची गरज असते. आपल्याला मिळालेल्या संधीचं आपण नक्कीच सोनं केलं आहे. सेवा निवृत्त जरी आपण झाले असाल तरी शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो. यापुढेही पेन्शनर म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडणं तितकच गरजेचं आहे. शिक्षक म्हणूनच नाही तर इतर कोणत्याही क्षेत्रात काम करून आपण समाजात सक्रीय रहायला हवे अश्या भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केल्या.
आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला सत्यजीत तांबे यांचा आभार दौरा आजही अविरतपणे सुरूच आहे. याच आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी आज शहादा म्युनिसिपल हायस्कूलच्या शिक्षकांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना उद्भवणाऱ्या समस्या शिक्षण संघटनांनी लोकांना समजावून सांगायला हवे मोठ्या प्रमाणावर त्यांचा पाठींबा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे, तेव्हाच एक दबाव निर्माण होऊन शासन आपल्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेईल असा सल्ला आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित शिक्षकांना दिला.
शिक्षकांना शिक्षण विभागाशी निगडित आपल्या वैयक्तिक कामांसाठी आणि संस्थेच्या कामांसाठीही वारंवार सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा पाठपुराव्यासाठीही जावे लागते. या सगळ्यात शिक्षकांच्या वेळेचा मोठा अपव्यय होतो आणि परिणामी विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. त्यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा संगणकीय प्रणालीद्वारे उपाययोजना करण्याचे काम सुरु असून शिक्षकांना कामांसाठी सरकार दरबारी खेटे घालायची गरज पडणार नाही अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.
निवडणूकीच्या काळात एकूण १२० संघटनांनी मला पाठींबा दिला होता. पाठींबा देत असताना त्यांनी मांडलेल्या विविध समस्या, प्रश्न व मागण्या सोडविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु असून शासन स्तरावर पाठपुरावादेखील सुरु आहे.
सत्यजीत तांबे, आमदार








