नंदुरबार l प्रतिनिधी
ब्रेकअप झाल्याने युवती बोलत नाही याचा राग आल्याने सदर युवती तिच्या भावासोबत दुचाकीने जात असतांना दुचाकी अडवून युवतीला खाली ओढून तिला व तिच्या भावाला मारहाण करुन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील वासदरा येथील युवती व नांदरखेडा येथील युवकाचे प्रेमसंबंधात ब्रेकअप झाले. यानंतर युवतीने युवकाशी बोलणे बंद केले होते. याचा राग आल्याने दि.१२ मे रोजी सदर युवती तिच्या भावासोबत नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील हस्ती नगर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरुन दुचाकीने जात होती. यावेळी युवकाने त्याच्या मित्रासह युवतीच्या भावाची दुचाकी अडवून युवतीला दुचाकीवरुन खाली ओढले व बळजबरीने त्याच्या दुचाकीवर बसवून घेवून जाण्याचा प्रयत्न केला.
यास युवतीच्या भावाने विरोध केला असता युवकाने युवती व तिच्या भावाला मारहाण केली. तसेच उचलून घेऊन जाऊन युवतीच्या परीवाराला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घटनास्थळावरुन युवकासह त्याच मित्र पसार झाला. याबाबत युवतीच्या फिर्यादीवरुन नांदरखेडा येथील संशयित युवक व त्याच्या मित्राविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५७, ३२३, ३२४, ३४१, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.संपत वसावे करीत आहेत.








