धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय भुजगाव येथे ग्रामपंचायत शिपाई,संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवकाला पाहिल्यादांच ध्वजारोहणाचा मान देऊन समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील धडगाव तालुक्यात भुजगाव ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत शिपाई आणि संगणक ऑपरेटर ध्वजारोहणाचा मान आणि रोजगार सेवकाला पूजन आणि श्रीफळ अर्पण करण्याचा सन्मान देऊन सर्व समाजात एक चांगला संदेश दिला आहॆ. आपल्या अभिनव उपक्रमाने कायम चर्चेत राहणाऱ्या भुजगांव ग्रामपंचायत यंदाही महाराष्ट्र दिनी झालेल्या ध्वजारोहणामुळे पुन्हा चर्चेत आले. यंदाच्या 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय भुजगाव येथे शिपाई दिलीप सकना पाडवी यांच्या हस्ते,जिल्हा परिषद शाळा भुजगांव येथे ग्रामपंचायत सगणक ऑपरेटर संजय फोफऱ्या पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ग्राम रोजगार सेवक सुभाष सायसिंग पावरा यांना पूजन आणि श्रीफळ अर्पण करण्याचा सन्मान दिला.
भुजगाव ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुशिक्षित तरुणांची मोठी फळी निवडून आले असुन पुरोगामी विचारांनी प्रभावित झालेली आहेत. हरणखुरी गावात व भुजगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्याचे इतक्या वर्षात एकदाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नाही. या गोष्टीला फाटा देत यंदा ग्रामपंचायत शिपाई व संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवकाला मान देऊन खऱ्या अर्थांनी महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत विकासात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या आणि अहोरात्र कर्तव्यास तत्पर राहणाऱ्या ग्रामपंचायत शिपाई, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवकाचा सन्मान व्हावा यासाठी यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कर्मचारी यांना ध्वजारोहणाचा मान देण्याचे ठरले. त्यामुळे समाजात एक चांगला संदेश जाईल.
अर्जुन पावरा लोकनियुक्त सरपंच-भुजगाव
भुजगांव ग्रामपंचायत निर्मितीपासुन मी शिपाईपदावर काम करत आहे. 1 में महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहणाचा मान मला अचानक देण्यात आला पहिल्यांदाच असा प्रसंग आला मी खुप भावनिक झालो.दिलीप सकना पाडवी,शिपाई ग्रामपंचायत भुजगांव.