नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील अव्वल गाझी दर्गा परिसरात असलेल्या पुलाच्या नाल्यामध्ये २ हजार रुपयांच्या नकली नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.दरम्यान आढळलेल्या नोटा या खऱ्या की, खोट्या याची चाचपणी करण्यासाठी पुलाजवळ तुंबळ गर्दी जमा झालेली होती. त्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
नंदुरबार- साक्री रस्त्याजवळील शहरातील अव्वल गाजी दर्ग्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या नाल्यात आज रविवारी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास २ हजार रुपयांच्या नकली नोटा आढळल्या. परिसरात कचरा वेचणाऱ्या काही मुलांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितले. काही क्षणातच ही वार्ता धुळे नाका परिसरात पसरल्याने दोन हजार रुपयांच्या नोटा पाहण्यासाठी पुलावर मोठी गर्दी झाली.

अनेकांनी पुलाच्या खाली उतरून नोटांची चाचपणी केली असता नोटा ह्या नकली असल्याचे आढळून आले. यावेळी नोटा पाहण्यासाठी पुलाच्या कठड्यावर गर्दी झाली होती. नोटा पाहण्यासाठी वाहन चालकांनी पुलावरच वाहने वाहने उभी केल्याने शहरातून येणारी व जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

दरम्यान पुलावर अज्ञाताने कचऱ्याची पिशवी टाकली होती. दुपारी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कचऱ्याची पिशवी सुटल्याने त्यातील कचरा बाहेर आला. त्यानंतर ‘त्या’ नकली नोटा देखील बाहेर आल्याचे सांगितले जात आहे.