नंदूरबार l प्रतिनिधी
बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या असून बालविवाहामुळे बालकांच्या विशेषतः मुलींच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह या समस्येचे समुळ उच्चाटन झाले तर बालविवाहामुळे होणाऱ्या इतर आरोग्याच्या समस्या, कुपोषणाच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होईल. या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा महत्वाकांक्षी उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला होता.
बालविवाह रोखणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी असून आपल्या परिसरात होवू घातलेल्या प्रत्येक बाल विवाहाबाबत नजिकच्या अक्षता समिती, बीट अंमलदार तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचीत करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ऑपरेशन अक्षताच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले होते.
त्याअनुषंगाने दि. 30 मार्च 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना चाईल्ड लाईन, नंदूरबार या संस्थेमार्फत माहिती मिळाली की, अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत अक्षता सेलला अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे जावून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेलच्या प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे व त्यांच्या पथकाने तात्काळ अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे जावून तेथे पोलीस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीचे सदस्य ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा स्वंयसेविका यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली. सदर अल्पवयीन मुलीची माहिती घेतली असता सदरची अल्पवयनी मुलगी 14 वर्षे 2 महिने वयाची होती व तिचा विवाह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्याच्या देवरुखली गावातील राहणाऱ्या युवकासोबत 30 मार्च रोजी निश्चित करण्यात आला होता.
परंतु त्यापुर्वीच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेल व मोलगी पोलीस ठाणे स्तरावर सुरु करण्यात आलेल्या अक्षता समितीने अल्पवयीन मुलीचे आई, वडील व इतर नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलींना होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच मोलगी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस अल्पवयीन मुलीच्या पालकांना देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात असलेली बालविवाहाची मोठी समस्येचे समुळ उच्चाटन करण्यात यश येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक धनराज निळे, अक्षता सेलचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, पोलीस अंमलदार अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, अरुणा मावची, वालंबा का. गावाचे सामाजिक कार्यकर्ते धीरसिंग पाडवी, ग्रामसेवक शांतीलाल बावा, अंगणवाडी सेविका श्रीमती शिवाजीबाई पाडवी यांनी केली आहे.
पालकांनी मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाईकांना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व । लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. तसेच आपल्या परिसरात होणाऱ्या बालविवाहाबाबत अक्षता समितीचे सदस्य पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंणवाडी सेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचीत करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.








