शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यापीठ स्तरीय दोन दिवसीय “संशोधन प्रकल्प” या विषयावर कार्यशाळा आणि “संशोधन प्रकल्प सादरीकरण” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील ऐ.आर.ऐ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ आर. डी. वाघ, शिरपूर येथील एच.आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ एस.बी.बारी, शिरपूर येथील गौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एम.के.भामरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ. एस.पी.पवार उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यापीठाने दिलेल्या नियमावली प्रमाणे विद्यापीठ स्तरीय”संशोधन प्रकल्प सादरीकरण” स्पर्धा ही फक्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी होती. सदर स्पर्धा ही तीन गटात आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात “संशोधन प्रकल्प” या विषयावर कार्यशाळेत डॉ.आर.डी. वाघ यांनी सांगितले की, रिसर्च (संशोधन) ही काळाची गरज आहे त्यासाठी लागणाऱ्या विविध पायऱ्या असून संशोधन करण्यासाठी लागणारी माहीती व संशोधन करतांना मुख्य घटक जे असतात त्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून संशोधन करावे त्याचप्रमाणे यामध्ये विविध पद्धतीचा वापर केला जातो. त्यांनी सांगितले की आधीच्या काळातले उपचार पद्धत आणि आता नव्या काळातील उपचार पद्धत संशोधनामुळे खूप प्रगत झाली असून त्याच्यामुळे वेळ पैसा वाचतो आणि त्यासोबत विविध घटकांची जीवनशैली ही कशी सुधारले आहे हे मधुमेहाचे उदाहरण देऊन संक्षेपात स्पष्ट केले.
त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ.एस.बी.बारी यांनी सांगितले की, संशोधन पद्धती खूप महत्त्वाचे असून संशोधन ही एक वैज्ञानिक कार्यपद्धत आहे. संशोधन ही कधीच न संपणारी प्रक्रिया आहे त्यात अनेक अडचणी येत असतात परंतु विद्यार्थ्यांनी त्या अडचणींवर मात करून संशोधनाचे कार्य अविरत पणे चालू ठेवावे. कोणतीही समस्या हे आपण शास्त्रीय पद्धतीने सोडवू शकतो. त्याचप्रमाणे साहित्य, संदर्भग्रंथांची सूची आपण आराखड्यात ही जोडत असतो त्यालाच शास्त्रशुद्ध संशोधन पद्धत म्हणतात. संशोधन करताना प्रथमतः माहितीचे संकलन करणे हे खूप महत्त्वाचे असते आणि त्याला खूप साऱ्या दिशा असतात तसेच संशोधकाने त्या कार्यात स्वतःला झोकून व पूर्ण वेळ देऊन संशोधन करीत रहावे. खेडेगावातल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न ठेवता नव नवीन कल्पनांवर अभ्यास व संशोधन केले पाहिजे.
एम.के.भामरे यांनी सांगितले की, सर्वांगीण विकास कसा जोपासला पाहिजे. विद्यार्थ्यानी आपल्या जीवन जगण्याची कला कशी आत्मसात केली पाहिजे व कशा पद्धतीने संकटांना धैर्याने सामोरे जायला हवे हे त्यांनी रामायण व महाभारतातील विविध दाखले देऊन स्पष्ट केले. संशोधन करतांना मनोधैर्य आणि आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा घटक असतो आणि तो घटक संशोधकांमध्ये असणे गरजेचे असते आणि तो त्याच्या साह्याने संशोधन पूर्ण करू शकतो. जिद्द व चिकाटीने जर कोणतेही कार्य केले तर ते पूर्ण होत असते. सदर कार्यशाळेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दुसऱ्या दिवशी “संशोधन प्रकल्प सादरीकरण” स्पर्धा ही विज्ञान आणि तंत्रज्ञान गट, कला आणि वाणिज्य गट आणि शिक्षणशास्त्र या गटात झाली. यामध्ये एकूण 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादरीकरण केले. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.डॉ अविनाश निकम, प्रा.डॉ मिलिंद पाटील यांनी काम पाहिले.
यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान गटात प्रथम क्रमांक शेख जुबेर आणि पटेल बिलाल, द्वितीय क्रमांक पाटील पंकज आणि पाटील निकिता, तृतीय क्रमांक मोरे हितेश यांनी पटकावला. कला आणि वाणिज्य गटात प्रथम क्रमांक पटेल ममता आणि पाटील साक्षी, द्वितीय क्रमांक जायस्वाल सिमा आणि सोनवणे निकिता, तृतीय क्रमांक पटेल सुजाता आणि पाटील करिष्मा यांनी पटकावला. तर शिक्षणशास्त्र गटात प्रथम क्रमांक परदेशी निकिता आणि मराठे हर्षदा, द्वितीय क्रमांक पाटील जागृती आणि वसावे राहुल, तृतीय क्रमांक पटेल जागृती आणि पटेल रुचिका यांनी पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, संयोजक, प्रा.मानसी धनकानी यांनी केले तर आभार, संयोजक, प्रा. सुलभा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ हेमंत सूर्यवंशी, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अमृता पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.