नंदूरबार l प्रतिनिधी
तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने नियोजन समितीस अतिरिक्त स्वरूपात अधिकाधिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी यांनी विभागीय नियोजन समिती च्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा. डॉ.हिना गावित,आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले की,तोरणमाळ येथील निसर्गरम्य पर्यटनाचा विकास व्हावा तसेच अतिदुर्गम भागात रोजगार व उद्योगाची गंगा व्हावी या हेतूने २०२० साली शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तोरणमाळचा विकासा साठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याअनुषंगाने प्रशासना कडुन सुमारे ५०० कोटींचा आराखडा शासनास सादर करण्यात आला. परंतु सत्ताबदलानंतर आज अस्तित्वात असलेल्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येते आहे.अतिदुर्गम आदिवासी नंदुरबार जिल्ह्यात पर्यटन विकास होऊन रोजगार व उद्योग निर्मिती व्हावी या अनुषंगाने स्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या तोरणमाळ विकास प्राधिकरणास गती द्यावी तसेंच सद्य परिस्थितीत तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटनकांच्या सोयी साठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे सांगत तोरणमाळच्या विकासा साठी जिल्हा नियोजन समितीस अतिरिक्त स्वरूपात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच धडगाव येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचा आराखडा मंजुर करुन निधी द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.








