नंदुरबार l प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील दरने येथील तरुण हा पोळा सणाचे औचित्य साधत शोरूममधून नवीन मोटरसायकल घेऊन घरी जात असताना अज्ञात नराधमांनी दरने ते चिमठाणा रस्त्यावर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आला आहे. सदर घटनेतील संशयित नराधमांवर फास्टट्रॅकने खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना नंदुरबार जिल्हा राजपूत समाजातर्फे देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यातील दरने येथील रहिवाशी प्रेमसिंग राजेंद्र गिरासे वय 21, हा तरुण घरातील एकुलता एक होता.घरची परिस्थिती बेताचीच असल्याने सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच होती. प्रेमसिंग गिरासे हा तरुण पशुचिकित्सक म्हणून कार्य करीत होता. घरात सर्व सुखी-समाधानी सुरू असतानाच सणासुदीच्या दिवशी त्याच्यावर नराधमांनी दरने-चिमठाणे रस्त्यावरील सबस्टेशन जवळ धारदार शस्त्राने वार करून त्यास जीवे ठार केले व त्याची नवी घेतलेली दुचाकी सदर नराधमांनी पोबारा केली.सदरचे कृत्य करणाऱ्यांना राजांचा संपूर्ण राजपूत समाजातर्फे निषेध व्यक्त करण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, पृथ्वीराज रावल, विजय राजपूत , महेंद्र राजपूत, सुनील गिरासे, प्रदीप गिरासे, पृथ्वीराज चव्हाण, सुरेंद्र राजपूत, कृपाल राजपूत, गणेश राजपूत, हर्षल राजपूत, नितीन नागरे, धीरज राजपूत आदींसह समाजबांधव उपस्थित होते व निवेदनावर सह्या आहेत.