नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे उड्डाणपूल बांधण्यात यावा , मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात यावे , यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपच्या वतीने केंद्राच्या रेल्वे मंडळाच्या प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यांना देण्यात आले .
भारतीय रेल्वे मंडळाच्या प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यांचे नंदुरबार येथे आगमन झाले . या वेळी याकमिटीचे प्रमुख डॉ.राजेंद्र फडके , छोटूभाई पाटील , कैलाश वर्मा , गिरीश राजगोर , विभा अवस्थी यांचे स्वागत भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले . याप्रसंगी नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे रेल्वेच्या विविध समस्यांबाबत निवेदनदेखील देण्यात आले . या वेळी खासदार डॉ . हीना गावित , जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील , भटके – विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे , वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शाह , प्रा.पंकज पाठक , युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी , सुनील वाघरी आदी उपस्थित होते . सिंधी कॉलनीकडे मोठी वस्ती झाल्याने या भागात जाण्यासाठी ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा . तसेच आरक्षित व अनारक्षित तिकीट खिडकी या भागात उभारण्यात यावी , संपूर्ण रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे , अशीही मागणी करण्यात आली . रेल्वे स्टेशनच्या काही भागात शेड नाही . त्यामुळे पूर्ण स्थानकावर कव्हरशेड उभारण्यात यावा , नंदुरबार – पुणे ही प्रवासी गाडी लवकर सुरू करण्यात यावी , मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात यावे , दिव्यांग – व्यक्तींसाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची सुविधा करण्यात यावी , प्रवाशांना थांबण्यासाठी एका रूमची – व्यवस्था करण्यात यावी , अशी मागणी करण्यात आली .