नंदुरबार| प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सावळदे येथे तुम्ही नेहमी माझ्या घराच्या अंगणात का उभे राहतात असे विचारल्याचा राग आल्याने जमावाने दोघांना लाठया काठयांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरूध्द सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील सावळदे येथील धर्मा पुन्हा महाले यांच्या घराच्या अंगणात सोमनाथ ठाकरे व बंडू पवार उभे असतांना धर्मा महाले यांनी तुम्ही नेहमी माझ्या घराच्या अंगणात का उभे राहतात. असे विचारले. याचा राग आल्याने सोमनाथ ठाकरे यांनी इतरांना बोलवून गैरकायद्याची मंडळी जमवून धर्मा महाले व त्यांच्या भावाला लाठया काठया व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मदा पुना महाले व सुभाष पुना महाले दोन्ही रा.सावळदा यांना दुखापत झाली. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सारंगखेडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी धर्मा पुना महाले यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात सोमनाथ शंभू ठाकरे, बंडू कर्मा पवार, संग्राम शंभू ठाकरे, राजु संजय पवार, विशाल मनोज पवार, शंभू अमृत ठाकरे, संजय कर्मा पवार सर्व रा. सावळदा (ता.शहादा) यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि भगवान कोळी करीत आहेत.