नंदुरबार l
नंदुरबार तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन उमेदवार निवडून आले आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मनसेने देखील आपले खाते उघडले आहे. मनसेचे नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी यांच्यासह दोन सदस्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
नंदुरबार तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला असून निमगाव ग्रामपंचायतीत मनसेचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. निमगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुनील कोकणी, सुप्रिया चौरे, कमल गांगुर्डे या तीन उमेदवारांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेकडून उमेदवारी देण्यात आली होती.
हे तिन्ही उमेदवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सुनील कोकणी हे मनसेचे नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असून निमगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले आहे. या नवनियुक्त सदस्यांचा मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुका अध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, प्रसिद्धीप्रमुख कल्पेश माळी, पवन माळी आदींनी सत्कार करून आनंद व्यक्त केला.








