नंदुरबार l
महावितरणच्या धुळे व नंदुरबार मंडळात वीजबिल वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दर महिन्याला अपेक्षेप्रमाणे वसुली होताना दिसून येत नाही. उद्दिष्टपूर्तीसाठी अभियंते-कर्मचाऱ्यांना दर आठवड्यास वसुलीचे उद्दिष्ट द्या आणि जे अभियंते-कर्मचारी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकत नसतील,
अशा अभियंत्यांवर कारवाई करावी, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी गुरुवारी दिले. धुळे व नंदुरबार मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्रात डांगे यांनी धुळे व नंदूरबार मंडळातील सर्व अभियंत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याबाबत सूचना करताना थकबाकीदार कुणीही असो, वीजबिल भरले नसेल तर तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला डांगे यांच्यासमवेत व्यासपीठावर जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे,
धुळे मंडळाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, नंदुरबार मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे उपस्थित होते. बैठकीत डांगे यांनी महावितरणच्या गेल्या चार महिन्यातील वीजबिल वसुलीचा आढावा घेतला. वसुली का रखडली, याची कारणेदेखील जाणून घेतली. मात्र, या आढाव्यात अनेक अभियंत्यांचे थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालेली दिसून आले नाही.
त्यामुळे डांगे यांनी नाराजी व्यक्त करून सर्व अभियंत्यांना वसुलीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले.
ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिल वेळेत देण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सी नेमल्या आहेत. या एजन्सींना मीटर रीडिंग घेताना छायाचित्राचा दर्जा सुधारणे तसेच अचूक कामकाज करण्यास सांगण्यात आले.
शासनाचा सेवा पंधरवडा उपक्रम सुरू आहे. यात अर्ज केलेल्या ग्राहकांना नवीन घरगुती वीजजोडण्या तत्परतेने देण्यात याव्यात व नावात बदल करण्यास तातडीने मंजुरी देण्यात यावी, असे निर्देशही डांगे यांनी दिले.








