नंदूरबार l प्रतिनिधी
चौंडी येथे झालेल्या महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या राज्यव्यापी बैठकीत ठरल्यानुसार महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. चिमण डांगे, प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ,मल्हार सेना प्रदेशाध्यक्ष बबनराव रानगे व अन्य पदाधिकारी हे जिल्ह्यातील समाज बांधवांशी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संघटना बांधणी, आगामी कार्यक्रम, समाज जागृती,आरक्षण, मेंढपाळांच्या समस्या, आपसातील मतभेद विसरून समाजासाठी एकत्र यावे,कोणताही भेदभाव करू नये,गट तट करू नये,सर्वांना विश्वासात घेऊन समाजहिताचे निर्णय घेणे अशा विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यानिमित्ताने नंदुरबार जिल्हा धनगर समाज महासंघ,मल्हार सेना, कर्मचारी महासंघ व अहिल्यावहिनीच्या वतीने भव्य जिल्हा मेळाव्याचे आयोजन दि.११ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ९.३० वाजता दंडपाणेश्वर मंदिर, नंदुरबार येथे करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच पेन्शनर हॉल,गांधीनगर, नंदुरबार येथे नियोजन बैठक खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीसाठी जिल्हा धनगर समाज महासंघ ,मल्हार सेना, कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे सदस्य,अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यातील समाजाच्या २२ गावांमध्ये समाजबांधवांच्या भेटीसाठी गेले होते व सदर मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थितीबाबत आवाहन केले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी विविध समित्या स्थापन करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच नंदुरबार येथे संपन्न होणाऱ्या या भव्य जिल्हा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील समस्त धनगर समाज बांधवांना उपस्थित राहणे बाबतचे आवाहन करण्यात आले आहे.








