नंदुरबार | प्रतिनिधी
५० हजार रुपयात विक्री केलेल्या मध्य प्रदेश राज्यातील सहा वर्षीय अल्पवयीन बालकाची स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीसांनी सुटका केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.४ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , मध्य प्रदेश राज्यातील बर्हाणपूर जिल्ह्यातील एका ६ वर्षीय अल्पयीन बालकाला नंदुरबार शहरातील एका मेढपाळ व्यावसायीकाला ५० हजार रुपयात मजूरीसाठी विक्री करण्यात आली आहे . पोलीस अधीक्षकांनी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली ४ वेगवेगळे पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचे पथकांनी मेंढपाळ व्यावसायीकाचा व अल्पवयीन बालकाचा नंदुरबार शहरात व शहराबाहेर परराज्यातील व जिल्ह्यातील असलेल्या उतारूंचा शोध घेतला परंतु उपयुक्त अशी काही एक माहिती मिळून येत नव्हती .
सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील उप प्रादेशीक परिवहन कार्यालयासमोर असलेल्या कोळसा डेपोजवळ काही मेंढपाळ असून त्यांच्यासोबत एक अल्पवयीन बालक देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ कोळसा डेपोजवळ धाव घेतली . एक बालक काही मेंढ्यांना चारा घालत असतांना दिसून आल्याने पोलीसांनी त्यास जवळ घेवून विचारपूस केली.
त्यावेळेस त्या अल्पवयीन बालकाने सांगितले की , तो मुळचा मध्य प्रदेश राज्यातील राहाणारा असून त्याचा नातेवाईक मारुती याने त्यास ठेलारीकडे मेंढ्या चारण्यासाठी दिलेले आहे . त्यावरुन मेंढपाळ संशयीत आरोपी गुंडा नागो ठेलारी रा . भोणे ता.नंदुरबार यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने अतिशय धक्कादायक माहिती दिली . मारोती सोवकर रा . गारबर्डी ता . जि . बर्हाणपूर मध्य प्रदेश या इसमाने ५० हजार रुपये घेवून खातला फाटा ता . जि . बर्हाणपूर येथील त्याच्या नातेवाईकाचा अल्पवयीन मुलाला मेंढ्या चारण्यासाठी दिलेले आहे .
त्याअनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक मध्य प्रदेश राज्यातील बर्हाणपूर जिल्ह्यात रवाना केले . पोलीसांच्या पथकाने गारबर्डी जि . बर्हाणपूर मध्य प्रदेश येथून मारोती रामा सोनकर वय २० रा . गारबर्डी ता.जि. बर्हाणपूर मध्य प्रदेश यास ताब्यात घेवून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले . त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर मुलास ५० हजार रुपयांत मेंढपाळ व्यवसायीकाला दिले असल्याचे कबुल केले असून त्यास अटक करण्याची प्रक्रीया सुरु आहे .
६ वर्षीय अल्पवयीन बालकाला बाल कल्याण मंडळासमोर हजर करुन त्याचे पुर्नवसन करण्यात आले असून अल्पवयीन बालकास त्याच्या आई – वडीलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे . गुंडा नागो ठेलारी, मारोती रामा सोनकर यांचेविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीताना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात घेतले . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार ,
नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , सहा . पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील , पोलीस उप निरीक्षक प्रवीण पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अमंलदार यांनी केलेली आहे.








