नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत दुसर्या हप्त्याची रक्कम शुक्रवारी जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याला वितरित केली असून शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वर्ग केले जाणार असून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सहभागी शिक्षकांना सदर थकित दुसरा हप्ता रोखीने आपल्या बचत खात्यावर वर्ग केला जाणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी दिली आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा थकीत दुसरा हप्ता राष्ट्रीय निवृत्तीवेतनधारकांना रोखीने व निवृत्ती वेतनधारक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह खात्यात वर्ग करणेबाबत शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार माहे जून महिन्याच्या वेतनसोबत देणेबाबत शासन आदेश असतांना व अनुदान प्राप्त असतांनाही सदर थकीत हप्ता देण्यात शिक्षण विभागाकडून दिरंगाई केली जात होती. शिक्षक परिषदेच्या तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या शिक्षक संपर्क मेळाव्यातही बहुतांशी शिक्षकांनी सदर प्रश्न उपस्थित करीत शिक्षण विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सदर प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक दैनिकांनीही या वृत्ताची दखल घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षक परिषदेकडे अपेक्षेने सदर विषय निकाली काढण्याची विनंती केली होती.
सदर प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रसंगी शिक्षक परिषदेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनास आंदोलनाचा इशाराही दिला होता. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सातत्याने निवेदने देऊन व प्रत्यक्ष जिल्हा परिषदेला भेट देऊन शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड, जिल्हाध्यक्ष नितेन्द्र चौधरी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून व अनुदान तात्काळ तालुकास्तरावर वितरित करणेबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.
प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांनी तात्काळ कार्यवाही करत सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्याची एलओसी शुक्रवार रोजी प्रत्येक तालुक्यास वितरित केली असून लवकरच याचा लाभ शिक्षकांना मिळणार असून जिल्ह्यातील शिक्षकांनी याबाबत समाधान व्यक्त केल्याची माहिती पुरुषोत्तम काळे यांनी दिली आहे.