नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खु. येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
उमर्दे खु. ता. नंदूरबार येथे भव्य विठ्ठल रुक्माई मंदिर उभारण्यात आले आहे. विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनासाठी येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र यावर्षी विठूरायाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले असून त्याचबरोबर परिसरात पावसाने चांगला जोरही धरल्याने परिसरात समाधान असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पहाटे ४ वाजेला भगवंताची आंघोळ त्यानंतर काकड आरती होईल, काकड आरती झाल्यानंतर सहा वाजेला विठ्ठल रखुमाईच्या अभिषेकाला सुरुवात होईल. व सकाळी सहा वाजेला अभिषेक झाल्यानंतर ७ वाजता महाआरती यजमान खंडू गागरे सपत्नीक करतील .
सकाळी आठ वाजता उमर्दे खु. येथे भगवंताची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता भाविकांसाठी फराळ महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात येईल. रात्री साडेआठ वाजता सुमधुर संगीतमय भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टीतर्फे करण्यात आले आहे.








