नंदुरबार l प्रतिनिधी
शहरी भाग अन पुढारलेल्या घटकांपाठोपाठ ग्रामविकास देखील राष्ट्र विकासाच्या मूल्यमापनातील प्रमुख घटक आहे. म्हणून खेड्यांनी विकासाच्या दिशेने पाऊल टाकतांना स्थानिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या साधनांच्या माध्यमातूनच गावाचा विकास साधावा असा सूर पथराई (ता. नंदुरबार) येथे झालेल्या अखिल भारतीय ग्रामविकास कार्यशाळेत उमटला.
जनजाती भागातील गावे पर्यायाने त्या – त्या भागातील बांधवांच्या विकासासाठी वनवासी कल्याण आश्रमतर्फे ग्रामविकास प्रकल्प सुरु करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत देवगिरी प्रांतमार्फत राष्ट्रीय ग्रामविकास कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत १६ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रसन्न सप्रे, कृपा प्रसाद सिंग, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जगदीश जोशी, संदीप कवीश्वर, बिंदेश्वर जी., गजानन डांगे, देवगिरी प्रांतचे चैत्राम पवार, गणेश गावित, वीरेंद्र वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपक्रमांचा आढावा:-
देशभरात विखुरलेल्या ग्रामविकास प्रकल्पमार्फत कुठले उपक्रम राबविण्यात आले, याचा आढावा घेत पुढील उपक्रमांचे नियोजन प्रकाल्पनिहाय समजून घेण्यात आले. त्यात शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
वृक्षारोपण व ग्रंथपूजा:-
राष्ट्रीय कार्यशाळेनिमित्त देशभरातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत के. डी. गावीत शैक्षणिक संकुल पथराई येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. तर ग्रंथपूजेचा कार्यक्रमही घेण्यात आला.