म्हसावद l प्रतिनिधी
या वर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला जयनगर ता.शहादा येथील तीर्थक्षेत्र श्री हेरंब गणेश देवस्थानात हजारो भाविकांनी दर्शन घेत नवस फेडले. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात आले होते.
संपुर्ण खानदेशमध्ये उजव्या सोंडेचा गणपती म्हणून जयनगर येथील हेरंब गणेशाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. कोरोना काळात मंदिरे बंद होती तेव्हा भक्तांना अंगारकी चतुर्थीला बाहेरून दर्शन घ्यावे लागत होते. निर्बंध हटल्यानंतर यावर्षी अंगारकी चतुर्थीचा पहिला योग असून येथील हेरंब गणेश देवस्थान भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच ज्या भाविकांनी नवस मानलेला होता त्यांनी नवस फेडला. तर जे नवदांपत्य नवविवाहित होते त्यांनी अभिषेक करवून घेतला. चतुर्थीला परिसरातील नारळ विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते, फुलहार विक्रेते, शृंगार वाले, खेळणीवाले यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर दिसून आली. अंगारकी चतुर्थीला जिल्ह्यासह, मध्यप्रदेश येथील हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. मंदिर ट्रस्टच्यावतीने भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंदिर परिसरात मंडपाची सोय करण्यात आली होती. तसेच मंदिरातही कुलरची व्यवस्था करण्यात आली होती. महिला व पुरुषांना स्वतंत्र रांगेत टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी आज सोडण्यात येत होते. संपूर्ण मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती.