नंदुरबार l प्रतिनिधी
हिमालयात जाण्याच्या शब्द फिरवल्याने कार्यकर्ते त्यांच्या पासून काय आदर्श घेतील असा सवाल उपस्थित करून बोलतांना भान ठेवूनच बोललं पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आ.एकनाथराव खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला.
नंदुरबार येथे राष्ट्रवादीचे नेते खडसे यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारात उडी घेतली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत २ तास जाहीर सभातून बोलत होते. प्रचारसभेत फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी मतदारांवर घोषणांच्या पाऊस पाडला. भीष्मप्रतिज्ञा दिल्या तरीही मतदारांनी त्यांना साफ नाकारलं.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या हिमालय जाण्याच्या मुद्द्यावरून ते म्हणाले, निवडणूक हरल्यास हिमालयात देऊ असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते. परंतु, ते आता दिलेल्या शब्दांपासून पळवाटा शोधत असल्याने त्यांच्यापासून त्यांचे भाजप कार्यकर्ते काय आदर्श घेतील असा खोचक सवाल उपस्थित करीत बोलतांना भान ठेवण्याच्या सल्लाही त्यांनी दिला.
मशिदींसमोर भोंग्याने समाजात तेढ
हनुमान चालीसा वाजवण्यासाठी कोणतेही कायदे नाहीत. हनुमान चालीसाचे पठण हे केलेच पाहिजे तो हिंदू धर्माचा एक भाग आहे. मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मर्यादा नाहीत. परंतु, एखाद्या मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावत असाल तर त्याठिकाणी तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दोन समाजात तेढ निर्माण होऊन त्याच्या पुढील कालावधीत समाजाला दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत याचे चित्र उभे राहता कामा नये असे शेवटी खडसे म्हणाले