नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या प्रस्तावित नूतन इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.या सभेत एकूण बारा विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
नंदुरबार नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बुधवारी सर्वसाधारण सभा झाली. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत एकूण बारा विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विरोधी गटातील आणि सत्ताधारी नगरसेवकांकडून झालेल्या शाब्दिक चकमकीने किरकोळ अपवाद वगळता सभा पार पडली. दरम्यान पालिकेची नवीन मुख्याधिकारी म्हणून अमोल बागुल यांचे स्वागत करण्यात आले. या सभेत मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारती वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा खरेदी करून बसविण्याबाबत मंजुरी देण्यात आली तसेच पाणीपुरवठा विभागातील विविध कामे करणे कामाची मुदत संपल्याने मुदतवाढ करणेबाबत, नगरपालिका मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर घेणे बाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील इमारत दुरुस्ती व इतर स्थापत्य संबंधीची कामांना मुदतवाढ देणेबाबत चर्चा करण्यात आली. नूतन प्रशासकीय इमारत बांधकामास मुदतवाढ देणे कामी आलेल्या अर्जावर विचार विनिमय करण्यात आला. सभेला उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्य अधिकारी अमोल बागुल, वैशाली जगताप,संजय माळी, दीपक पाटील उपस्थित होते.