म्हसावद l प्रतिनिधी
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मोहिदे त. शहादा या वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन मोहिदे येथील पोलीस पाटील मुकेश गवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गृहपाल एस.के.केदारे होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त दि.6 ते 16 मार्च या कालावधीत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. यावेळी वसतिगृहाचे गृहपाल यांनी सामाजिक समता कार्यक्रमाचे नियोजन व या कालावधीत घेतले जाणारे विविध स्पर्धा व कार्यक्रम याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रमुख अतिथी मुकेश गवळे यांनी आपल्या मनोगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या समानतेच्या व लोकशाहीच्या मार्गावर चालून नियमित अभ्यास करत राहिल्यास शैक्षणिक प्रगतीचा मार्ग अधिक सुलभ होईल. आधुनिक भारताच्या जडणघडणीत संविधानाचे महत्व त्यांनी विषद केले. सामाजिक न्याय विभागामार्फत मिळालेल्या विविध सुविधांचा सुयोग्य वापर प्रत्येक विद्यार्थ्याने आपला शैक्षणिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले. स्वयं प्रकाशित व्हा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी केला तरच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असेही ते म्हणाले. शालेय परिसर, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
सामाजिक समता कार्यक्रमात वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, रक्तदान स्पर्धा, पथनाट्य, प्रबोधन, संविधान जागर, व्याख्यान, चर्चासत्र, स्वच्छता इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल श्री.एस.के केदारे यांनी केले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी चंद्रकांत शिरसाठ यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.








