नंदुरबार | प्रतिनिधी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर अनेक वर्षापासून सुरू असलेल्या संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान चौपाळे ते समाधीस्थळ आशा (नर्मदा) पर्यंत होणार्या पदयात्रेला आज दि.७ मार्चपासून चौपाळे येथून प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते.
संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान चौपाळे तर जलसमाधी घेतलेल्या आशा (गुजरात) पायी दिंडीला आजपासून ब्रम्हलीन रामचैतन्य बापू यांचे मानसपूत्र संतश्री संतोष चैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत आजपासून चौपाळे येथून प्रारंभ झाला. सदर दिंडी चौपाळे येथून सकाळी ७.३० वाजता निघून नंदुरबार येथे ८.३० वाजेच्या सुमारास पोहोचली. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे या दिंडी स्थगित करण्यात आली होती. आज मोठया संख्येत भाविक दिंडीत सहभागी झाले. हरेराम जयघोषात ही दिंडी नंदुरबार शहरातील प्रमुख रस्त्यांवर मार्गस्थ झाली. नंदुरबार नंतर रात्री चिचोदा येथे मुक्काम राहणार असून दि.८ एप्रिल रोजी दुपारी वेलदा तर रात्रीचा मुक्काम कुकरमुंडा दि.९ एप्रिल रोजी अक्कलकुवा कौली दि.१० एप्रिल रोजी धनसरा चौकडी (सागबारा, गुजरात) माच चौकडीचा अगोदर दि.११ एप्रिल रोजी डेडीयापाडा पंडया आश्रम रात्री मोस्कुवा हनुमान मंदिर येथे मुक्काम असून दि.१२ एप्रिल रोजी दुपारी दशामा तर रात्री नेत्रंग येथे मुक्काम दि.१३ एप्रिल रोजी घोलीफाटा (बल्लेश्वर) तर रात्री राजपार्डी येथे मुक्काम असणार आहे. दि.१४ एप्रिल रोजी दुपारी उमल्ला तर रात्री आशा येथील श्रीदगाजी महाराज आश्रम येथे मुक्काम व कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि.१५ एप्रिल रोजी श्री सद्गुरू धाम निर्लोभी आश्रम रेखाखंड आशातर्फे नर्मदा पूजन व पादुका पुजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कार्यक्रमाची पुर्णाहूती होणार आहे.
नंदुरबार शहरात आज आलेल्या संतश्री दगाजी महाराज दिंडीत भाविक मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.