- नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे 0 ते 6 वयोगटातील बालके, गरोदर व स्तनादा माता यांच्या आरोग्य तपासणी आणि लसीकरणासाठी 1 जून ते 28 जून 2021 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत आतापर्यंत 1 हजार 52 अतितीव्र कुपोषित आणि 4 हजार 963 मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळून आली असून त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी मान्सून पूर्व आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या निर्देशानुसार विशेष खबरदारी घेवून मोहिमेचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर, पर्यवेक्षिका, आरोग्य परिचारीका, आरोग्य सेवकांचा आरोग्य तपासणी आणि लसीकरणात सहभाग होता. सुरुवातीच्या टप्प्यात अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ही मोहिम राबविण्यात आली. यापुढील टप्प्यात इतर तालुक्यातही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
मोहिमेसाठी गाव आणि पाडानिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अंगणवाडीनिहाय आरोग्य तपासणी करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यात 55 आणि धडगाव तालुक्यात 50 पथकाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. पथकात 105 वैद्यकीय अधिकारी, 67 अंगणवाडी पर्यवेक्षिका, स्वयंसेवी संस्थेचे 28 कर्मचारी सहभागी झाले होते. पथकांच्या संनियंत्रणासाठी तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
पथकाद्वारे 0 ते 6 वयोगटातील वजन व उंची घेऊन सॅम व मॅम बालकांचा शोध घेणे, गावाकडे परत आलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांची आरोग्य तपासणी करणे, आजारी बालकांचे निदान करून उपचार व संदर्भ सेवा देणे, कुपोषण कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणे आदी कामे करण्यात येत आहेत. तपासणी करताना कोरोना विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालनही करण्यात येत आहे.
अक्कलकुवा तालुक्यात 472 अंगणवाडी केंद्रापैकी 373 केंद्रातील अहवाल प्राप्त झाले असून 25 हजार 294 बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 613 अतितीव्र कुपोषित आणि 3134 मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. धडगाव तालुक्यात 524 अंगणवाडी केंद्रापैकी 263 केंद्रातील अहवाल प्राप्त झाले असून 14 हजार 980 बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 439 अतितीव्र कुपोषित आणि 1829 मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. तपासणीत आढळलेल्या सॅम बालकांचे प्रमाण 2.61 टक्के आणि मॅम बालकांचे प्रमाण 12.32 टक्के आहे.
जिल्ह्यात 4 पोषण पुनर्वसन केंद्र आणि बालउपचार केंद्र असून 42 सॅम बालकांवर उपचार करण्यात येत आहे. उर्वरीत सॅम बालकांना ग्रामस्तरावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ईडीएनएफ औषधीयुक्त आहाराद्वारे उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात युनिसेफ आणि जिल्हा परीषदेच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून कुपोषणाच्या आकडेवारीत सुधारणा दिसून येत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांनी दिली आहे.