नंदुरबार | प्रतिनिधी
नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांना मालमत्ता कर आकारला जात नाही याबाबत यापुर्वीही विरोधकांना सांगण्यात आले आहे. परंतू झालेली विकास कामे विरोधकांना सहन होत नसल्याने ते नको त्या विषयावर नागरिकांची दिशाभूल करुन आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे प्रत्युत्तर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिले.
शहरवासियांना अपमानित करून चालवलेली घरपट्टी वसुली पालिकेने थांबवावी तसेच भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातूनच त्यांनी थकीत घरपट्टीच्या रकमा भरून द्याव्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयचौधरी यांनी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना दिले आहे. तसेच घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फलकावर जाहीर करून अपमानित करण्याच्या पद्धतीला भारतीय जनता पार्टीने निदर्शने केले होते. याबाबत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, नगरपालिका ही एकमेव संस्था अशी आहे जी ११ महिने सेवा देत व शेवटच्या महिन्यात कर वसुल करते. तेही काही नागरिक वेळेवर भरत नाहीत. त्यामुळे घरपट्टी वसुलीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. त्यामुळेच थकबाकीदारांच्या नावाचे फलक चौकात लावण्यात आले आहेत. मात्र, दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपा खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. नगरपालिकेच्या एका अधिकार्याच्या चुकीमुळे नाटयमंदिराचे कर बाकी असल्याची माहिती समोर आली. मुळात नगरपालिकेच्या मालकीच्या कोणत्याही मालमत्तेला मालमत्ता कर आकारला जात नाही. शेजारच्या शिरपूर नगरपालिकाही कुठलाही कर आकारत नाही, याबाबतचे पत्र शिरपूर पालिकेने दिले आहे. विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर नाटय मंदिराचे उत्पन्न ४ कोटी असेल तर विरोधकांनी फक्त २ कोटी द्यावे, सीबी गार्डनचे उत्पन्न १० कोटी असेल तर विरोधकांनी ५ कोटी द्यावे, इंदिरा मंगल कार्यालयाचे उत्पन्न एक कोटी असेल तर विरोधकांनी केवळ ५० लाख द्यावे त्यांना या सर्व वास्तू १ एप्रिलपासून हस्तांतरीत करण्यास तयार आहे. मात्र, सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल विरोधकांनी थांबवावी, असेही श्री.रघुवंशी यांनी सांगितले.








