नंदुरबार l प्रतिनिधी
नगरपालिकेचे नेतृत्व करणारे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना जर नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीची इतकीच चिंता आहे, तर मग विकासकामांच्या नावाखाली नगरपालिका माध्यमातून भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशातूनच त्यांनी थकीत घरपट्टीच्या रकमा भरून द्याव्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, हे आमचे त्यांना जाहीर आव्हान आहे, असे जाहीरपत्रक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयचौधरी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नंदुरबार नगरपालिकेने सध्या घरपट्टी वसुलीची धडक मोहिम राबविणे चालू ठेवले असून जे लोक आर्थिक अडचणीमुळे घरपट्टी भरू शकलेले नाहित, अशा थकबाकीदारांची नावं फलकावर जाहीर करून त्यांना अपमानित करण्याचं काम नगरपालिकेचे नेतृत्व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांनी कठोरपणे चालू ठेवलं आहे, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते. हे एका प्रकारे मानवी हक्काचं, जनतेच्या सार्वभौमत्वाचं हनन आहे. आम्ही यापूर्वीही प्रशासनाकडे तसेच सरकार दरबारी सातत्याने मांडत आलो आहोत की, कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून नंदुरबार शहरातील व्यावसायीकांचे कंबरडे मोडले आहे. डबघाईला आले आहेत. सरकारी आणि खाजगी नोकरी करणार्या अनेकांना रोजगार गमवावा लागला व सर्व जण आर्थिक संकटात आले. घाम गाळून जमवलेली पुंजी अनेकांना कोरोनामुळे घरात बसलेले असतांना गमवावी लागली. लहान मोठ्या सर्व व्यावसायीकांची, व्यापार्यांची, कामगारांची, विक्रेत्यांची, मजुरांची, दुकानदारांची, हॉटेलचालकांची कमाई थांबल्यागत झाली होती आणि आता कुठे तरी चालना मिळून हाती दोन पैसे येण्याची त्यांना आशा निर्माण झाली आहे. परंतु कोरोनाची भिती व निर्बंधांची टांगती तलवार देखील कायम असल्याने खरोखर सर्वकाही अद्याप सुरळीत झालेले नाही. अशावेळी त्यांना दिलासा देणारी भुमिका घेण्याऐवजी आणि त्यांना सहकार्याची भुमिका घेण्याऐवजी नगरपालिकेचे नेतृत्व चंद्रकांत रघुवंशी व रत्ना रघुवंशी हे जनतेकडून हुकूमशाही पध्दतीने वसुली करीत आहे. थकबाकीदारांची नावं जाहीर फलकांवर लावून अपमानीत करीत आहे. हे जनता कधीही खपवून घेणार नाही. स्वत: चंद्रकांत रघुवंशी यांच्या अधीपत्याखाली असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराची २७ लाखाची घरपट्टी थकीत आहे. ज्या नाट्यमंदिरातून ते राजकारण करत सर्व सूत्र हलवतात ते नाट्यमंदिर त्यांनी भागीदारीने आपल्या बगलबच्च्यांना चालवायला देऊन ठेवले आहे. त्याचे नाव थकबाकीदारांच्या यादीत का घेतलेले नाही. त्यांच्या बगलबच्च्यांना चालवायला दिलेल्या इंदिरा मंगल कार्यालय, सीबी गार्डन आदी संस्थांकडेही लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. मग त्यांचं नाव फलकावरच्या यादीत का नाही? सामान्य लोक, सरकारीनिमसरकारी नोकर, लहान मोठा व्यावसायिक, मध्यमवर्गीय यांना मात्र जाहीरपणे अपमानीत करतात. नगरपालिकेने जाहीरपणे चालवलेला हा भेदभाव असून ही अतीशय निंदनीय आणि खेदाची बाब आहे. भारतीय जनता पार्टी याचा धिक्कार करून निषेध नोंदवते.
घरपट्टीसंदर्भात लोकांचा छळ चालू असतांना हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की, चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरपालिकेची सत्ता राबवतांना रस्तेविकास, भुमिगत गटारी, सुशोभीकरण आदी विकासाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. विकासकामांच्या नावे नगरपालिकेचा तो भ्रष्टाचाराने लुबाडलेला पैसा नंदुरबारवासियांच्या हक्काचा पैसा आहे. तेव्हा चंद्रकांत रघुवंशी यांना जर नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीची इतकीच चिंता आहे, तर मग त्या पैशातूनच त्यांनी थकीत घरपट्टीच्या रकमा भरून द्याव्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, हे आमचे त्यांना जाहीर आव्हान आहे.असे पत्रकात म्हटले आहे.








