शहादा ! प्रतिनिधी
तालुक्यातील लोंढरे येथील एका शेतकरी कुटुंबातील आई, वडील व मुलाने जीवनयात्रा संपवल्याने गावात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी गावात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
लोंढरे (ता. शहादा)येथील नथा बुधा माळी (वय ५७), पत्नी सखुबाई नथा माळी (वय ५२), मुलगा गोपाळ नथा माळी (वय ३५) हे तिघे काल (दि.२२) बाहेर गावी जात असल्याचे सांगत सकाळी घरून निघाले. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने कुटुंब वाट पाहत होते. त्याच दरम्यान सायंकाळी सोशल मीडियावर गिधाडे (ता. शिरपूर) येथील तापी नदीपात्रात कुणीतरी मोटारसायकल उभी करुन उडी टाकली असल्याची माहिती क्लिपद्वारे फिरत होती. त्यात मोटरसायकलच्या क्रमांक व मोटरसायकलही दिसत होती. गावातील काही नागरिकांच्या मोबाईलवर ही क्लिप आल्यानंतर ही गाडी आपल्या गावातील आहे हे लक्षात आले. बातमी गावात समजताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे सदर घटना निष्पन्न झाल्यानंतर गावात व कुटुंबात शोककळा पसरली.
दरम्यान नथा माळी यांना दोन मुले असून लहान मुलाने आई वडिलांसमवेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या गोपाळ माळी यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर व सहा वर्षाची मुलगी वैष्णवी त्याचबरोबर भाऊ जय असा परिवार आहे.