नंदुरबार येथून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची आदिवासी व संशोधन व प्रशिक्षा संस्था पुणे येथे संचालक पदावर बदली झाल्याने त्यांना महसूल विभागातर्फे निरोप देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते श्री.भारुड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, डॉ.भारुड यांच्या पत्नी अश्विनी ठाकूर, उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक युवराज राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे आदी उपस्थित होते.
श्री.भारुड यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, कोरोना काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगली टीम मिळाल्यामुळे परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळता आली. यंत्रणेवर विश्वास ठेवल्याने चांगले काम करता आले. प्रत्येक विभागाने आपले काम चोखपणे बजावले. नंदुरबारमधून नवी ऊर्जा घेऊन नव्या पदावरदेखील चांगले काम करण्याचा प्रयत्न असेल. नंदुरबारकरांचे प्रेम आणि सहकार्य कायम लक्षात राहील, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री.गावडे म्हणाले, जिल्हा परिषदेसाठी रुग्णवाहिका, वर्गखोल्या व अंगणवाडी बांधकामासाठी डॉ.भारुड यांचे चांगले मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. लसीकरणाला गती देण्यासाठी त्यांनी सूक्ष्म नियोजनावर भर दिला.
श्री.पंडीत म्हणाले, पोलीसांना वाहने व इतर आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी डॉ.भारुड यांचे चांगले सहकार्य लाभले. त्यांनी कोरोना संकटकाळात चांगली कामगिरी केली. सर्व विभागाच्या समन्वयाने काम करण्याची त्यांची पद्धत असल्याने पोलीस विभागालाही चांगले सहकार्य मिळाले.
श्री.खांदे, बबन काकडे, चेतन गिरासे, श्री.राठोड, ज्ञानेश्वर सपकाळ, मंदार कुलकर्णी, उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, राजेंद्र शिंदे, ओम कुलकर्णी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.