नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या महिला सहाय्यता कक्षाने ६५ कुटुंबाचा संसार जुळविला. पुरुषांकडुन महिलांवर होणार्या मानसिक व शारीरीक त्रासामुळे कौटुंबिक कलहावर पडदा टाकुन संसार जोडण्याचे काम ते करत आहे. या अंतर्गत गेल्या सहा महिन्यात सदर कक्षाकडे १७० अर्ज दाखल झाले आहे. त्यापैकी ६५ कौटुंबिक कलह सामोपचाराने तसेच समुपदेशनाने सुरळीत व सुव्यवस्थीत सुरु करण्याचे काम महिला सहाय्य कक्षाने केले आहे.
महिलांवरील अन्याय आणि विशेषत: कौटुंबिक कलह निर्मूलनासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस मुख्यालयांतर्गत असे कक्ष कार्यरत आहे. याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्यता कक्ष कार्यरत आहे. कक्षातील अधिकारी व अमंलदार हे तक्रारदार महिला व तिचे सासरकडील कुटुंब अशा दोघांचे समुपदेशन करुन त्यांच्या संसार सुरळीत पणे चालविण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात. पिडीत महिलांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणुन १०९१ हा टोल फ्रि क्रमांक सुरु करण्यात आला आहे. सदर कक्षात महिलांविषयक कौटुंबिक तक्रारीचे निवारण करण्यात येते. विशेषत: लॉकडाऊनमध्ये तसेच बेरोजगारी मुळे सर्वचजण घरात असल्याने व त्यात आर्थिक अडचणीमुळे कारणांनी काही घरात पती- पत्नी, सासु – सुन, मुलगा – वडील अशा अनेक नात्यांमध्ये तक्रारी व भांडणे होवु लागली त्यामुळे कौटुंबिक कलह मोठया प्रमाणात वाढले होते. कोविडच्या दुसर्या लाटेमुळे घरातील कौटुंबिक कलह अजुन मोठ्या प्रमाणात सुरु झाले. अशा सुमारे १७० तक्रारी या कक्षा कडे प्राप्त झाल्या. यामध्ये पती बाहेरख्याली वागतो, सासु – सुनेचे पटत नाही, पतीने अनैतिक संबध तसेच पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या तक्रारी प्राप्त होतात.
तक्रारदार महिला व त्यांचे कुटुंबीय यांना भविष्यात होणार्या परिणामाची माहिती देवुन देखिल वाद मिटत नसल्यास अशा वेळी संबधीत गैरअर्जदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो. कौटुंबिक कलहातुन पतीने घराबाहेर काढलेल्या महिलांना कक्षातील अधिकारी व अमंलदार यांनी आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने घरगुती गृह उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन केल्याने काही तक्रारदार महिलांना स्वत:चा गृहउद्योग सुरु केला आहे.
आलेल्या तक्रारी मिटवुन पुन्हा सुरळीत संसार व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, सहा. पो उप निरीक्षक भगवान धात्रक, महिला पोहे कॉ प्रमिला वळवी, विजया बोराडे, प्रिती गावीत, महिला पो.शि अरुणा मावची हे प्रयत्नशील असतात.