नंदुरबार ! प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावाजवळून कपड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून चालकाने हातपाय बांधून त्यातून सुमारे २७ लाखांचे कपडे चोरुन नेल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, पन्नालाल नन्हेलाल चंद्रवंसी रा.पायली खुर्द ता.छपरा मध्यप्रदेश हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये (एम.एच.४० वाय ४३१९) सुरत सारोली येथून कपड्यांचा माल घेवून धुळे-सुरत महामार्गाने नागपूरकडे जात होते. यावेळी विसरवाडी गावाच्या पुढे एका पुलाजवळ चार अनोळखी इसमांनी चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करीत पन्नालाल चंद्रवंसी यांचा ट्रक अडविला. चौघा अनोळखी इसमांनी पन्नालाल चंद्रवंसी यांना धमकावत बळजबरीने त्यांचे हातपाय बांधून पन्नालाल चंद्रवंसी यांना ट्रकसह दहिवेल गावाजवळ घेऊन गेले. तेथे ट्रकमधून २७ लाख २२ हजार ४२३ रुपये किंमतीचे ९३ बॉक्स त्यात वेगवेगळ्या कंपनीच्या साड्या, सलवार व इतर ड्रेस पिस, ५०० रुपये किंमतीचा एक मोबाईल व १० हजाराची रोकड असा एकूण २७ लाख ३२ हजार ९२३ रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत पन्नालाल चंद्रवंसी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.एस.शिंपी करीत आहेत.