नंदुरबार ! प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाकडून नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातस्वयंचलित कृषी हवामान यंत्र बसविले आहे . यामुळे शेतकऱ्यांना दर पंधरा मिनिटांनी हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानावर आधारित शेती करणे व शेतीचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे . इंडिया मेटेओलॉजी डिपार्टमेंट चे जिल्ह्यातील हे पहिलेच स्वयंचलित कृषी हवामान केंद्र असल्याचे सांगितले जात आहे .
भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी मौसम सेवाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्हा कृषी हवामान केंद्र दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले . या माध्यमातून आठ हजारापेक्षा अधीक शेतकऱ्यांना घरपोच मोबाईलच्या माध्यमातून हवामान अंदाजाची माहिती पुरविली जात आहे . स्थानिक ठिकाणी हवामानाची माहिती मिळावी , यासाठी ही सोय करण्यात आली आहे . या केंद्रामार्फत जिल्ह्यातील जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना व्हॉट्स ॲप व इतर माध्यमातून दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्ह्याचा आणि तालुकानिहाय हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देण्यात येतो . यासोबतच नुकतेच हवामानाची माहिती मिळावी , यासाठी भारतीय हवामान विभागाकडून स्वयंचलित कृषी – हवामान केंद्र बसविण्यात आले असून , दर १५ मिनिटांनी हवामानाची आकडेवारी यामध्ये संकलित केली जाते . स्वयंचलित हवामान केंद्रांमधून कमाल आणि किमान तापमान , सापेक्ष आर्द्रता , वाऱ्याचा ताशी वेग , दिशा , सूर्यप्रकाशाचा कालावधी , पाऊस , जमिनीचे तापमान आणि जमिनीतील ओलावा या सर्व नोंदी उपलब्ध होतात.पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे .
प्रत्येक पिकासाठी पाण्याची गरज वेगवेगळी असते . हंगामानुसारही पाण्याची गरज बदलते . या सर्व अभ्यासासाठी स्वयंचलित हवामान केंद्र अत्यंत उपयुक्त ठरते . स्वयंचलित कृषी – हवामान केंद्रच्या माध्यमातून तापमान , आर्द्रता , पाऊस , हवेचा वेग , जमिनीतील ओल व तापमान यांची माहिती तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत हवामानाचा अंदाज यावर आधारित कृषी सल्ला मिळणार असल्याने शेतकऱ्याचा फायदा होणार आहे . पिकाच्या वाढीसाठी प्रामुख्याने योग्य तापमानाची गरज असते . आर्द्रतेचे प्रमाण , ढगाळ हवामान , पावसातील खंड आणि तापमान यावरून कीड व रोगांची तीव्रता – अभ्यासणे शक्य होते . जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज व कृषी सल्ला मिळविण्यासाठी ८ ९९९ २२६५६३ या नंबरवर संपर्क साधावा , असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी केले आहे .