नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे रनाळा येथे ३० मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने घरात शिरून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत फिर्यादी हरी जयराम पाटील यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या घराचे दरवाज्याची कडी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून तसेच घरातील डब्यात व गल्ल्यात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये प्रत्येकी सुमारे २० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची मंगळसूत्रे, २० हजार रुपये किमतीचा ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, तसेच ५० हजार रुपये रोख व १० हजार रुपये गल्ल्यातील रक्कम (५००, २०० व १०० रुपयांच्या नोटा) असा एकूण १,२०,००० रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दिनेश भदाणे करीत आहेत. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.








