नंदुरबार l प्रतिनिधी-
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नंदुरबार तालुक्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाकडून सादर करण्यात आला आहे.
या अहवालानुसार, नंदुरबार तालुक्यातील ५ गावे बाधित झाली असून सुमारे ३४४ शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. विविध पिकांपैकी विशेषतः कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकूण बाधित क्षेत्र सुमारे १९८.६० हेक्टर इतके नोंदवण्यात आले आहे.
तसेच मका व इतर पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले असून गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे उभ्या पिकांना फटका बसला आहे. मात्र इतर तालुक्यांमध्ये नुकसान नगण्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्राथमिक अहवाल असून पुढील पंचनामे सुरू आहेत. अंतिम अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली असून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.








