नंदुरबार l प्रतिनिधी-
विद्या हीच खरी संपत्ती, तीच यशाची गुरुकिल्ली या उक्तीचा प्रत्यय देणारा प्रेरणादायी सोहळा येथील का. वि. प्र. संस्था, संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दुबई येथे यशस्वीपणे कार्यरत असलेले भालेरचे सुपुत्र योगेश रमेश पाटील यांचा विद्यालयात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील होते. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, भालेरच्या सरपंच कविता पाटील, प्रगतिशील शेतकरी व सत्कारमूर्तींचे वडील रमेश पाटील, प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी व पर्यवेक्षक पी. डी. पाटील उपस्थिती होते.
कार्यक्रमात अध्यक्ष अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री .पाटील यांनी उद्योगी माणसाला जगात कुठेही संधीची कमी नसते असे सांगत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विदेशातील नोकरीच्या विविध संधींचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्याचे आवाहन केले. जिथे इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे योगेश पाटील हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य श्री.सूर्यवंशी यांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला.
सत्कारमूर्ती योगेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक प्रवास, परदेशात मिळालेल्या संधी आणि त्या संधींचा योग्य उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “कष्टाचे फळ गोड असते” या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या यशातून स्पष्टपणे जाणवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








