नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी हसन सकीना मियालाल मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तीन महिन्यापासून नंदुरबार जिल्हा पालकमंत्री नव्हते. अखेर पालकमंत्री पद मिळाले आहे.
महाराष्ट्र शासन च्या सामान्य प्रशासन विभागाने १८ मार्च २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. नंदुरबार जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून ॲड. माणिकराव कोकाटे यांना पालकमंत्री बनवण्यात आले होते. मात्र नाशिक येथील सदनिका घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्याने सतरा डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून खाते काढून घेतले होते. त्यानंतर 18 डिसेंबरला माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पदाच्या राजीनामा दिला होता.
त्यानंतर तब्बल तीन महिन्यात म्हणजेच 18 मार्चला बरोबर नंदुरबारच्या पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाचे उपसचिव हेमंत महाजन यांनी हा आदेश जारी केला आहे.या निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, निधीचे नियोजन, तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीवर आता पालकमंत्र्यांचे थेट लक्ष राहणार आहे.








