नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील खोंडामळी येथे वेदमंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात माता वाघेश्वरी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली.

3 ते ६ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
मंगळवार रोजी गावातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खोंडामळी तसेच आजूबाजूच्या गावांतील महिला, पुरुष व लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यानिमित्त संपूर्ण गावात घरोघरी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आई वाघेश्वरी देवीची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
४ फेब्रुवारी रोजी मूर्तीला जलसंस्कार, पुष्पसंस्कार, धान्यसंस्कार तसेच मंदिराची प्राणप्रतिष्ठा विधी पार पडले. ५ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस मंदिरातील मूर्ती व कळस यांची स्थापना करण्यात आली. रात्री हरी जागरणाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी भजन-भारुडाचा आनंद घेतला.
६ फेब्रुवारी रोजी ठाणेपाड्याचे दगा बापू आश्रम येथील आनंदराम महाराज, शनि महाराज कथाकार म्हणून प्रसिद्ध असलेले देवेंद्र महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा विधी पार पडला. या सोहळ्याने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आनंदात आणि भक्तिभावात पूर्णत्वास गेला.
मंदिर बांधकाम व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी लोकवर्गणीतून तसेच जिल्ह्यातील भक्तांनी आर्थिक सहकार्य केले. ग्रामपंचायतीने मंदिर बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली. येथे ५३ बाय ५३ फूट आकाराचे मंदिर उभारण्यात आले असून कळसाची उंची ७१ फूट आहे. लोकवर्गणी व ग्रामस्थांच्या सहकार्याने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजनही करण्यात आले होते.








