नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्याचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज शनिवार, दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नंदुरबार–शहादा बायपास रस्त्यावरील व्ही.जी.राजपूत लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी दिली.
स्व. अजितदादा पवार हे स्पष्टवक्ता, कणखर नेतृत्व आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ओळखले जात होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमीच ठाम आणि स्पष्ट राहिली. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या सर्वपक्षीय शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्ष एकत्र येत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणार असल्याने ही शोकसभा जिल्ह्यासाठी एकात्मतेचे प्रतीक ठरणार आहे.
दरम्यान, या शोकसभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केले आहे. अजितदादांचे कार्य, त्यांची स्पष्ट भूमिका आणि राज्यहितासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील, असेही त्यांनी नमूद केले.








