नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व सर्वांना आधार वाटेल असे कणखर नेते अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला मोठा धक्का देणारी आहे. पवार परिवाराशी आमच्या गावित परिवाराचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ही घटना आम्हाला सर्वांना चटका देऊन गेली.
अजित दादा हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांसाठी झटणारे प्रामाणिक नेते होते. राजकारणातील सर्वात शिस्तबद्ध, स्पष्टवक्ता आणि कणखर नेता त्यांच्या रूपाने आम्ही अनुभवला. माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब मंत्री असताना अजितदादा यांनी सकारात्मक राहून नेहमीच निधी मिळवून देण्याला मदत केली. त्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विकास कामांना गती मिळू शकली. त्यांच्याकडे अर्थ खाते असो, जलसंपदा असो अथवा जे पण महत्त्वाचे खाते असेल त्यातून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी तत्परतेने मदत दिली. खासदार असताना मला सुद्धा त्यांनी अनेकदा सकारात्मक राहून मदत केली. दोन वर्षांपूर्वी झेडपी अध्यक्षाना ग्रामीण डोंगराळ भागात दौरे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून चांगले वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी अजितदादा यांच्याकडे केली होती. ती बाब लगेचच मनावर घेऊन अजितदादा यांनी त्या काळी महाराष्ट्रातील सर्व झेडपी अध्यक्षांना चांगले स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्याविषयीचा जीआर तात्काळ काढला होता. अशा सर्व संदर्भाने ते आमच्या सदैव स्मरणात राहतील. त्यामुळेच नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याची जाणीव ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आस्था बाळगणारे एक जिव्हाळ्याचे नेतृत्व आपल्यातून निघून गेल्याची भावना आज मनात दाटून आली आहे.. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि गावित परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉक्टर हिना गावित, माजी खा. नंदुरबार.








