नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रजासत्ताक दिनाच्या व्यस्त व नियोजित कार्यक्रमातून वेळेत वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथील रिलायन्स समूहाच्या रुग्णालयात गेले आणि राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रति सद्भावना, सदिच्छा व्यक्त केल्याबद्दल डॉ. कुमुदिनी विजयकुमार गावित यांनी कुटुंबातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
तीन आठवड्यापूर्वी हृदयविकारामुळे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना नासिक येथील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले होते. बायपास सर्जरी नंतर प्रकृती सुधारली होती. परंतु मागील आठवड्यात पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबई येथील रिलायन्स समुहाच्या रुग्णालयात हलवणे भाग पडले होते. त्या पार्श्वभूमीवर काल दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी व्यस्त वेळापत्रक असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात भेट दिली. त्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कविता परिवारासमवेत सुमारे ३० मिनिटं रुग्णालयात होते. प्रत्यक्ष भेटून त्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपचार व्यवस्थेची माहिती घेतली. या दरम्यान डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या सुकन्या, माजी खासदार डॉक्टर हिना ताई गावित व जी.प.च्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्याकडून तपशील जाणून घेतला. तसेच रुग्णालयाच्या प्रमुखांशीही त्यांनी संपर्क साधून डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृती बाबत आवश्यक ते काळजी घेण्याचे निर्देश दिले. मागील आठवड्यात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांना तातडीने नाशिक येथून मुंबईला हलविण्याच्या प्रक्रियेत जातीने लक्ष घालत प्रत्यक्ष पूर्ण सहकार्य दिले होते. रिलायन्स रुग्णालयाच्या मुख्य संचालकांशी तथा नाशिक व मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून विमानतळाहून रुग्णालयापर्यंत वाहतूक व्यवस्थेत कुठलाही अडथळा येणार नाही व सरळ रुग्णालयात डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या रुग्णवाहिकेला प्रवेश दिला जाईल, अशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था बदल करण्याबाबत निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे त्या गंभीर प्रसंगात डॉक्टर हिनाताई गावित यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून धीर देणारा संवाद केला होता. काल स्वातंत्र्यदिनी सुद्धा त्याच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रति सद्भावना, सदिच्छा व्यक्त केल्याबद्दल डॉक्टर सौ. कुमुदिनी विजयकुमार गावित यांनी कुटुंबातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.








