नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात नवसंजीवनीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवा, मातृत्व व बाल आरोग्य उपक्रम, पोषण सुधारणा कार्यक्रम, तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. विनय सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, NGO प्रतिनिधी,लतिका राजपूत, डॉ. कांतीलाल टाटिया, डॉ. राजेश वळवी, तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण:
नंदुरबार जिल्हा स्थापनेपासून प्रथमच लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आरोग्य केंद्रातील संपूर्ण टीमचे अभिनंदन करत वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद नाईक, डॉ. पंकज कदम, डॉ. जयेश सूर्यवंशी, तसेच आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक आणि आशा सेविका यांचा बुके देऊन गौरव केला.
बैठकीदरम्यान डॉ. रवींद्र सोनवणे यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले.
बैठकीचा समारोप सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाच्या वातावरणात झाला.







