शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई द्या; भाजपाची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी–
परतीच्या वादळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाने लागोपाठ तडाखा देऊन शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून व मदत मिळवून देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार द्यावा अशी मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जि प सदस्य प्रवीण (मुन्ना) पाटील आदींनी निवेदनाद्वारे केली.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी या मागणीचे निवेदन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जि प सदस्य प्रवीण (मुन्ना) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना देण्यात आले. याप्रसंगी भालेर गावचे सरपंच चंद्रशेखर पाटील, खोंडामळीचे दिनेश पाटील, नगावचे सरपंच हर्षल पाटील, शिंदगव्हाण चे भरत पाटील, भालेर गावातील शेतकरी बन्सीलाल पाटील, जूनमोहिदे येथील शेतकरी जगदीश पाटील, नगाव येथील शेतकरी हिम्मत पाटील, तीसी गावातील शेतकरी भगवान पाटील, शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.







