भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये चिमुकल्या नवदुर्गांचे कन्या पूजन
नंदुरबार l प्रतिनिधी
नवरात्र उत्सवानिमित्त का. वि. प्र. संस्था संचलित द फ्युचर स्टेप स्कूल, येथे संस्थेचे कार्याध्यक्ष विजय भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या नवदुर्गांचे कन्या पूजन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून भालेरच्या माजी सरपंच सौ. बेबीबाई पाटील व विद्यमान सरपंच सौ. कविता पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती पूजनाने व नऊ रूपांतील चिमुकल्या नवदुर्गांच्या पूजनाने झाली. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी वेशभूषा धारण केलेल्या कन्यांचे स्वागत व पूजन करण्यात आले.
यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील नर्सरीपासून इयत्ता चौथीपर्यंतच्या तब्बल 100 कण्यांचे पूजन करून त्यांना ओढणी व भेटवस्तू देण्यात आल्या तसेच कन्या पूजनानिमित्त भोजनाचा प्रसादही देण्यात आला.
कार्यक्रमानंतर शाळा परिसरात रंगतदार गरबा नृत्य सादर झाले. चिमुकल्यांनी मनमुराद गरबा खेळत वातावरण दुमदुमवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








