दुर्गा दौडमधे माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; उपस्थितांनी अनुभवला श्रद्धा आणि राष्ट्रप्रेमाचा संगम
नंदुरबार l प्रतिनिधी-
नवरात्रोत्सवाच्या पावन निमित्ताने श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नंदुरबार विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेली दुर्गा दौड यंदाही प्रचंड उत्साहात, जयघोषात आणि राष्ट्रभक्तीच्या गजरात पार पडली.
या प्रेरणादायी दौडीमध्ये राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, तरुणांमध्ये नवचैतन्याचा संचार केला. दोघांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवत, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवांची प्रगल्भता अधोरेखित केली. माझे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दुर्गा दौड मधील कार्यकर्त्यांसमवेत बरेच अंतर धर्म ध्वज घेऊन चालणे, हे आजच्या दुर्गादौडीचे मोठे वैशिष्ट्य ठरले.
दुर्गा दौडची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आली. ग्रामदैवत आई खोडाईमाता मंदिरात महाआरती करून शक्तिस्वरूपिणीचे आशीर्वाद घेण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात मंत्रोच्चार, शंखध्वनी आणि भक्तीमय स्तोत्रांनी वातावरण भारले गेले होते.
महाआरतीनंतर सर्व सहभागी मंडळींनी एकत्र येत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीताचा सामूहिक गायन करीत आपल्या राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली. गगनभेदी घोषणांनी आणि भगव्या पताकांनी आसमंत भारून टाकला होता. युवक-युवतींचा उत्साह, शिस्तबद्धतेची साक्ष देणारा संचलन आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत झालेल्या घोषणांनी हा सोहळा केवळ एक दौड नसून, राष्ट्रसेवा, संस्कृती आणि श्रद्धेचा महाउत्सव आहे, हे अधोरेखित केले.
या दौडीमधून युवकांमध्ये जागरूकता, संघटनशक्ती आणि राष्ट्राभिमानाचे बीज रोवले जाते, हेच या उपक्रमाचे यश आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गेच्या शक्तिरूपाचे स्मरण करत, नवचैतन्याची प्रेरणा घेणारी ही दुर्गा दौड पुढील पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही; या शब्दात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख ठाकरे, सहप्रमुख नरेंद्र चौधरी, मयूर चौधरी, देवा कासार, नरेंद्र तांबोळी, भगवा ध्वजधारी मनीष मिस्त्री, राहुल मोरे, योगेश विसपुते यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.