आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणव गावित यांचा माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित व मा.खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते सत्कार
नंदुरबार l प्रतिनिधी
भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या रग्बी खेळातील खेळाडू प्रणव गावित यांचा नुकताच माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते आमदार निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
प्रणव गावित यांची चीन येथील ‘हॉट चायना’ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रब्बी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला लाभली आहे. परंतु चीनमध्ये खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्ट अभावी त्याच्या सहभागाला अडथळा निर्माण झाला होता.
ही समस्या लक्षात घेत प्रणव गावित यांनी डॉ. हिना गावित यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून पासपोर्टच्या प्रक्रियेला गती दिली. सामान्यपणे दीड महिना लागणारा पासपोर्ट केवळ दोन तासातच प्रणव यांना मिळून दिला, आणि त्यामुळे त्याला वेळेत चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली.
या विशेष कामगिरीबद्दल आणि देशासाठी मिळवलेल्या सन्मानाबद्दल आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी प्रणव गावित याचा फेटा, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी प्रणवचा संपूर्ण परिवार उपस्थित होता.
डॉ. हिना गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले, “गावातील आणि जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. प्रणवसारख्या युवकांनी इतरांसाठी प्रेरणा घ्यावी.”