नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहराला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. नंदुरबार शहरात गणपती स्थापनेची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे.या परंपरेत अनेक मंडळांनी विविध पौराणिक व आध्यात्मिक आरास व देखावे सादर केले आहे. याची प्रचिती म्हणून शहरातील संत कबीरदास व्यायाम शाळेतर्फे यंदा भव्य केदारनाथचा देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा शहरासह जिल्हातील नागरिकांसाठी मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
दरवर्षी धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या संत कबीरदास व्यायाम शाळेने यंदा उत्तराखंडमधील भगवान शंकराच्या पवित्र धामाचा अर्थात केदारनाथ मंदिराचा वास्तवदर्शी देखावा उभारला आहे. मंदीराची कलाकुसर, हिमालय पर्वतरांगांचे सौंदर्य, मंदिर परिसरातील वातावरण यांचे अप्रतिम दर्शन येथे घडविण्यात आले आहे. या सोबत भगवान महादेवाच्या 12 ज्योतिलिंगचा देखावाही येथे साकारण्यात आला आहे.
या देखाव्यात आधुनिक लाईट्स, आकर्षक सजावट तसेच ध्वनी-प्रकाश परिणामाचा वापर करून केदारनाथच्या वातावरणाचा अनुभव देण्यात आला आहे. भक्तांना प्रत्यक्षातच उत्तराखंडमध्ये तसेच 12 ज्योतिलिंगच्या दर्शनासाठी गेल्यासारखा भास होतो.
हा देखावा पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक व नागरिक गर्दी करत असून, धार्मिक वातावरणात लोक मंत्रमुग्ध होत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे.
या संदर्भात व्यायामशाळेचे अध्यक्ष कुणाल पवार यांनी सांगितले की दरवर्षी आम्ही धार्मिक तसेच समाजप्रबोधनात्मक विषयांवर देखावे साकारतो. यंदा केदारनाथ धामाची निवड करून भाविकांना श्रद्धा आणि अध्यात्म यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक भाविक हे केदारनाथ येथें जाऊ शकत नाही म्हणून त्यांना केदारनाथ धाम ची प्रचिती व्हावी या साठी हा देखावा सादर केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी जवळपास दिड ते दोन महिन्याचा कालावधी लागला आहे. देखावा उभारण्यासाठी संस्थापक अध्यक्ष नरेश पवार मंडळाचे अध्यक्ष कुणाल पवार,उपाध्यक्ष लोकेश अभंगे, सचिव निलेश तमायचेकर,खजिनदार सुरज
तमायचेकर,कार्याध्यक्ष भरत इन्द्रेकर, राहुल पवार,जयेश इन्द्रेकर, रितेश चव्हाण,सुशील नेतलेकर,
सागर तमायचेकर,मोंटू तमायचेकर,कल्पेश
तमायचेकर,रोहित सरोज,चेतन तमायचेकर,कपिल तमायचेकर,अभिषेक पवार, यश तमायचेकर,हितेश बाटूगे ,रवी नेतलेकर यासह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे.संत कबीरदास व्यायाम शाळेचे हे 53 वे वर्ष असून देखावा सादर करण्यात 2 रे वर्ष आहे मागील वर्षी या मंडळाने आगीयोगी चा देखावा सादर केला होता.तर पुढच्या वर्षी ही धार्मिक आरास ठेवण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकारी नी व्यक्त केला आहे. गणेश उत्सवामुळे शहराचे वातावरण अधिकच भक्तिमय झाले असून, केदारनाथच्या देखाव्यामुळे कबीरदास व्यायाम शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.