नंदुरबार l प्रतिनिधी
स्वर्गीय बटेसिंह भैयांच्या कार्याचा वारसा जपणारे व दीर्घकाळ म्हणजे उभ्या आयुष्याचे 55 ते 60 वर्ष रघुवंशी परिवाराशी निष्ठा ठेवणारे संतोष उत्तमराव पाटील यांनी अखेर भारतीय पार्टीत प्रवेश केला आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित,माजी खासदार डॉ. हीना गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजप प्रवेश करून राजकीय रणशिंग फुंकले.
शनिमांडळ पंचक्रोशीत राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे संतोष पाटील हे धुळे–नंदुरबार जिल्हा बँकेचे संचालक, तिलाली ग्रामपंचायतचे सरपंच तसेच शनिमांडळ वी का सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत राहिले असून त्यांचा परिचय प्रामाणिक, निष्ठावंत, डॅशिंग राजकीय नेतृत्व व तळागळातील लोकांमध्ये कार्य करणाऱ्या नेत्याप्रमाणे आहे.
यावेळी त्यांनी नंदुरबार तालुका विधायक समितीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याच्या अनुषंगाने त्यांनी स्पष्ट केले की –
“गतकाळात केलेल्या परिश्रमांना व स्वर्गीय बटेसिंग भैयांच्या राजकीय सुरवातीपासून संपूर्ण आयुष्य रघुवंशी परिवारासाठी समर्पित केले असताना प्रामाणिक कार्याला अपेक्षित महत्त्व न देता सतत डावलले जाते. पाटील समाजातील कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो, हे खेदजनक आहे. म्हणूनच हा निर्णय घेतला.”
संतोष पाटील पुढे म्हणाले की, “डॉ. गावित साहेब यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकारणातील अनेक चढ-उतारांना सामोरे गेलेले पाटील यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे सांगितले. शनिमांडळ पंचक्रोशीत तयार होणाऱ्या युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला व युवकांना बळ देऊन नवे नेतृत्व घडवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संतोष पाटील यांना कधीच विश्वासात न घेतल्याने त्यांच्यात नाराजी होती.* महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांना कधीही स्थान न देता व विशेषत पाटील समाजाचा स्पष्ट वक्ता असल्या कारणाने नेहमी खच्चीकरण करण्यात आले,आणि पाटील समाजाचे नंदुरबार तालुका विधायक समितीतून राजीनामा देणारे पहिलेच संचालक* असल्याची भावना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.